श्री शके १६७२ मार्गशीर्ष शुद्ध १
सो। कृतानेक सा। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशळ तागायत छ २९ माहे माहरम सोमवार, कूच आज भुसावड, व डीग मु॥ सिलमानपूर लस्कर, श्रीजीस्वामीचे कृपाकटाक्षें यथास्थित असे. विशेष. काम्याहून मुजरत कासीद रवाना केला आहे, त्याजवरून सकलही अवगत जालें असेल. सारांश, श्रीजी काम्याहून डीगेस आले. मेजमाची तमाम लस्करासी करवून आपणही भोग लाविली. व खुद राणीसुधा जाटाचे थें जाऊन दर्शनलाभें पावन जाठजाठणीस केलें. से पनास अशर्फी नजरनियाजेच्या मिळवून तोरे नौ व जवाहिर रकम दोनी व एक हाथी मिळविला. तदनंतर सुरजमलजींनीं भरथपुरासी नेऊन तेथील गढचा बंदोबस्त तरतूद सर्व दाखविला. हाथी व घोडे, वस्त्रें व जवाहीर, नजरनियाज त्यानेंही सिष्टाचार करून मेजमानी केली. तदनंतर चौत्र्याची आशा बहुत होती; परंतु चुन्याचे व मातीचे चौथ्यांखेरीज आणखी चौत्रे दृष्टीस न पडले. राणीनेंही हजारपाचाशेयाचीं वस्त्रें व जवाहीर मिळवून त्यासी शोभा दिधली. राज्यही बदनसिंगजीस व सुरजमलजी व त्याचे दोघां पुत्रांसी वस्त्रें देऊन सरफराज केलें. त्यांनीं उभें राहून सिष्टाचार केला कीं, हे जागा तुमची व तुमचे वडिलाची दिधली आहे; आतां ज्यांसी ह्मणाल त्यासी सोंपिली जाईल; आह्मीं सर्वस्वें तुमचे आहों ; कोणाही गोष्टीचा उजूर न जाणावा. त्यांणीं ऐसा सिष्टाचार केल्यानंतर यांणीं त्यासच नवाजिलें. चारीपांच दिवस या सिष्टाचारांत लाऊन खुद येतों, पुत्रांसी पाठवितों, मातबर फौज समागमें देतों ह्मणून + + + + + + + + + + + + + + + + + पुत्रांचा लडा + + + + + न आले. शेवटी आह्मीं आपल्या घरची वाट धरली. बाजार बुनगाह इतर पहिलेंच घराची वाटें लाविलीच होती. आतां आजिचे चौथे दिवशीं घरासी पावावयाचे मुहूर्त काढिलेसे आहे. व, श्रीमंत सुभेदारजी तर वाडाण्यासी जाऊन लागले आहेत. आपाही कोट्यासी येऊन पावले. समीप पावले असतील. दिवाणजी आपण जायाची मस्त त्याजकडील करितात कनहीरामजी तर स्वामीसमीप. वरकड तात्यासो। व सखारामपंत सकलही मुतसदी तिकडेच. याजकडील मामिला लक्षांचा फडस्या कसा कोणाचे विद्यमानें होणार ? व रदबदली व भेटीगोष्ट सवाईजीप्रमाणें श्रीमंत दादासाहेबी घ्यावी; हाही मनसबा यांचा आहे. दिवानजी आपासा।सीही सिष्टाचार करितात. तेथें गेलियावर + + पां।चे विद्यमानें रदबदल गोष्ट मात करावी. जें ज्यासी ल्याहायाची सलाह असेल, तें ल्याहावी. न कळेलासा प्रसंग योजूं नये. वरकड तिकडील प्रसंग मुफसील लेखन करून संतोषविले पाहिजे. मिरबकशी यमुनापार जाले. आतां सरदार तेथील कोणें रुखें होतील ? हें सर्व लि॥ पाहिजे. समयोचित हरएकाचें व कनहीरामजीचें येणें जालिया उत्तम असे. अखेर हाही मामिला मोठा आहे. विस्तार काय लिहूं ? लाला नरसिंगदासजीही सुभेदाराचे समीपच आतां जातील. हे विनंति.