श्री
शके १६७२ कार्तिक वद्य ९
विनंति उपरि. आजी छ २२ जिल्हेजीं माहाबतखानाचे रेतीहून पुढें कुच केला, तुगलाबादचे बराबरीनें. आठ दिवस जाले कीं रेतींत येऊन पडले. एकदां पातशाहाजीस किल्लेंत जाऊन सलाम मुजरा हि करून आले. एकांत लोकांत हि बहुत कांहीं वजिराचे शामिलातीनें केला. सारांश, आडळलें कीं, लकेप तो शिष्टाचार जुबानी बहुत करून, हा काळवर शुष्कतेवर ठेवून, नक्की कच्चा खर्चायासी कपर्दिका, या रीतीनें वरकड मंडळीही उमेदवार ठेवून, कोरडी कृपा दाखविली. त्याजवरून हे वेजार जाले. बल्के, नागरमल व लुत्फल्लाबेग वगैरे जे मध्यस्थ होते यां सर्वांसी बेरुख होत्साते इंतजामुद्दौला वजीर यांसी स्पष्ट सांगून पाठविलें कीं, जर तुह्मासीं निघून यश संपादणें आहे. तर बाहेर निघा, नाहीं तर, आह्मी तर कुच करून जातों. तेव्हां वजीरजी रात्रीस येऊन साहा घटकापावेत एकांत लोकांत करून, बाहेर निघायाचा निश्चय करून, घरासी जाऊन, आजी प्रातःकाळी बादशाहाजीसमीप जाऊन, फते, पेंच व समशेर घेऊन, आज्ञा मागितली; व खास शुका मीर बक्षी व वजीर यांचे नावें लिहून घेतला कीं, जे कांहीं राजाधिराज व वजिरुन्मुमालिक सांगतील ते हजूरचीच जुबानी मानून कर्तव्यार्थ कीजे. या रीतीनें रुकसत होऊन रेतींत जुगलकिशोर यांचे बागांत येऊन दाखल जाले. + + + + + स्वार होऊन गेल्यानंतर नरसिंग + + + + + + दरजंग यांजकडून आले असतां, यांसी दोन वेळा एकांत जाहाला. त्यांचें समाधान निराळें केलें कीं, तुमचा कलह निवारणें, निमित्य व तकशीर माफ करून ध्यायानिमित्त आलों, ईश्वरइच्छेनें सर्व कलह दूर करून बादशाहाजीचे चित्तांतील किंतु दूर करून सर्फराज केले जाईल. या रीतीनें त्यासी लावून घेऊन, परस्परें भेटी जाहल्यानें सर्व मंडळी येईल ह्मणून लावून मायेममतेकडून उत्तरें लिहून पाठविली आणि त्यासी सांगात ठेवून घेतलें. अर्धरात्रीस अकबतमहमूद मीरबक्षीकडून येऊन पावला. त्यासी ठराविलें कीं, वजीर व बादशाहा सर्वहि पाहिले, सार्वभौम तुह्मावरी नाखुश होते, त्यांसी खुश करून जें करणें तें मीरबक्षीचेच विद्यमाने करावें. हा निश्चय करून येथून कुचाचें ठहराविलें. वजीरजीही येणार. ऐसीयासी, जरी तुह्मी लवकर येऊन पावाल तर तुमचेच मार्फातीची गोष्ट होईल; वजीरजी येऊन पावल्यानंतर मग उपाय नाहीं; ह्मणून त्यांसी निराळें लावून घेऊन ममतेनरूप मीरबक्षीस मध्यरात्रीसच मार्गस्थ केलें. त्यासी त्यांचीहि पत्रें आलीं कीं, अकबतमहमुदानें सर्व निवेदन केलें, याजवरून बहुत आनंद जाला, तुह्मीं लवकर येणें, अथवा दिवाण हरि गोविंद यासी तरी पाठविणें, ह्मणजे मजकूर मनासी आणून जें करणें तें लवकर केलें जाईल, तुह्माकारणें दिरंगावर गोष्ट टाकली आहे, विलंब न करावा. व जाटासी लिहिले आहे की :-