॥ श्री ॥ शके १६७२ कार्तिक शुद्ध १३
नकल
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री दामोदरपंत स्वामीचे सेवेसीः-
पोष्य जिवाजी गणेश कृतानेक नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असिलें पाहिजे. विशेष. खासगी खर्चास आह्मांकडे तुह्मांकडून सरकारांतून गुजराथच्या महालच्या रसदाचे ऐवजीं श्रीमंतांनीं एक लक्ष रुपये देविले आहेत. बजिन्नस सरकारची वरात आहे तेच तुह्मांकडे पाठविली आहे. शहरीं ऐवज द्यावयाचा तुह्मी करार केला त्याप्रमाणेंच वरातींत लिहिलें आहे. तरी पत्र पावतांच शहरची हुंडी करून देऊन रोकडा ऐवज मुदतीप्रमाणे शहरीं प्रविष्ट होये ते केले पाहिजे. आळंदीच्या यात्रेतील जिनसांचे खरेदीस हा ऐवज आह्मांस आपणाकडून देविला आहे. याजकरिता, ऐवज लौकर पावता होये तो अर्थ करावा. सदर्हू ऐवज आणावयासि रो। रामराव गौतम यांस पाठविले आहे. याची रवानगी शहरास सत्वर करून शहरी बाबूजीनाईक भिडे यांचे दुकानीं ऐवज जमा करावा. कळलें पाहिजे. मित्ति कार्तीक शु॥ १३, शके १६७२, प्रमोदनामसंवछरे. बहुकाय लिहिणे ? लोभ असोदीजे हे विनंती.