॥ श्री ॥ शके १६७२ कार्तिक शुद्ध १२
श्रीमंत राजश्री देवरावजी तात्या स्वामीचे सेवसी:-
पोष्य शामजी गोविंद. साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशळ ता छ ११ माहे जिल्हेज पर्यंत शहरीं यथास्थित जाणून स्वकीय कुशळ लेखन करावें. विशेष. स्वामींनी पत्र पाठविले ते पावले. लि॥ वर्तमान कळों आलें. ऐसेंच निरंतर पत्र पाठवून संतोषवीत जावें. * हिंदुस्थानचें वर्तमान लिहिलें तें कळों आलें. इकडील वर्तमान नबाबाचे दिवाणाचे पेशकार जगनाथ पंडित सिऊरकर होते. त्यास कितेक मनसबदार वगैरे लोकांसी नामाफकत होती, त्यामुळे त्याजला मारिलें. प्रस्तुत फिरंगी बाजवाड्यास जमाव करून आले आहेत, यामुळे हैदरबादेकडे चालिले. गुंडमटकाळेस पोंहचलीयाचीं पत्रें आली. आपण हैदराबादेस जाऊन, रुकनुदौला यास फौज समागमें देऊन पुढे रवाना करणार. त्याची पुढे चाल जालिया याची त्याची लढाई होणार. लढाईच्या प्रसंगामधे ईश्वर काय करतो ? हे पाहावें. वरकड कितेक वर्तमान आपण लिहिलें होतें. त्यास, चिरंजीव लक्ष्मणभाऊंनी लिहिले आहे, त्याजवरून कळों येईल. बहुत काय लिहिणें ? लोभ असो. द्यावा. हिंदुस्थानाकडील वर्तमान येईल, त्याप्रमाणें कृपा करून लिहीत जावें. हे विनंति.