पु॥ ८९
॥ श्री ॥
शके १६७२ ज्येष्ठ शुद्ध १३
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री अंताजी माणकेश्वर गोसावी यासीः-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ इहिदे खमसैन मयावअलफ. तुह्मी हिंदुस्थान प्रांतें जातां राजश्री पिलाजी जाधवराव यांच्या परगण्यांत धामधूम केली. कसबे बाबरे प॥ पलिलमरीटा प॥ सुतोडा येथें पैका घेतला, ह्मणून हुजुर विदित जाहालें. तरी म॥ रनिलेच्या तालक्यांत तुह्मांस धामधूम करून पैका घ्यावया गरज काय ? याउपरि त्याच्या मुलुकांत जो पैका घेतला असेल, तो माघारा देणें. येविसीं फिरून बोभाटा येऊं न देणें. जाणिजे छ १२ रजब. आज्ञाप्रमाण.
( लेखनसीमा )