॥ श्रीशंकर ॥
शक १६७१
नक्कल
फरमान श्रीमंत पंत प्रधान बाळाजी बाजीराव याचे नांवे,
या दिवसांत करारमदार मल्हारराव होळकर व जयाजी शिंदे खुलासा हे कीं ; श्री महादेव व मार्तंड व कुळस्वामी मधस्त दिल्हे आहेत. आपले जन्मभर शेवाचाकरी हजूरची व पारपत्य शत्रूचा अंतःकरणापासून करूं. अबदाली व राजेरजवाडे व जमीनदार लहान मोठे जो कोणी आज्ञा हजूरची अमान करील त्यांचे पारपत्य करावयास कधींही अंतर करणार नाहीं. आज्ञेप्रमाणेंच होईल. ज्या गोष्टींत सरकार चाकरी होईल तेच करूं. व रजामंदी हजूर व नवाब बहादुर व वजीरुल मु मालकची तेच अमलांत येईल. जो कोणी स्नेही हजूरचा व नवाब बाहादुरचा आहे तोच आमचा व शत्रू त्यांचा तो आमचा आहे. यास अंतराय जो कोणी सरकारची आज्ञा भंग करील त्याचें पारिपत्य मनोदयानुरूप आह्मी करूं, आणि पन्नास लक्ष रुपये ठराव त्यापैकीं तीस लक्ष रु॥ बद्दल पारपत्य अबदाली इनायत केलें. व सुबे मुलतान व पंजाब व थटा व भकर, व कमाविसी च्यार प्रो। नजीक काबील, व कमाविसाहिसार व संबळ व मुरादाबाद व वादाऊं याची चौथ, आमचे फौजेचे खर्चास टहराव जाला. आणि दोन हिस्से सरकारांत व एक हिस्सा शिबंदीस की बरोबर नवाब बाहादर व वजीराचे आहेत त्याचे खर्चस एकूण तीन हिस्से हजुरांत व सुबेदारी सुबे अजमेर व कमाविशी नारनोळ व सांबर वगैरे निम्मे व फौजदारी अकबराबाद व फौजदारी मथुरा वगैरे बमशर्त सुभेदारी व फौजदारी यांच्या रसदा आमचे नांवे ठराव होऊन दिल्हे. शपथपूर्वक करार करितो कीं, माफक मामुल , शर्ती व रसदा सुभेदारी व फौजदारी व पेशकशी बमोजब राजे व जमीदार व शिवाय लाजिमे वगैरे सुबेदारी व फैजदारी असे त्यांत काबीज होये आणि बंदोबस्त सुव्याचा व फौजदारीचा करून. प्रांत पातशाही कोणे जमीनदारानें व राजानें दाबोन घेतले असेल तरी सोडोन घेऊं. त्यापैकी मुलुक अर्धा हजुरांत व अर्धा आमचे फौजेचे खर्चास घेऊं. यानंतर जर कोणी मसलत पडली तरी फौज व अमीर व तोफखानाविशी विनंति केलियास हुजुरातून तैनात होय जरी अबदालीचे लढाई विशई एक आह्मांस आज्ञा जालियास हाजीर व खास स्वारी जालियास तयार होऊन नंतर खुद्द कामाची असेल ते चाकरी करून. दुसरे कोणास पातशाही मर्जी जाली तरी जे आह्मी विनंती करूं ते उमराव बरोबर द्यावें. उभेता आह्मी एक चित्त होऊन कामाचा बंदोबस्त करूं. चाकरीत उजूर कदापि करणार नाही. यांत शपथपूर्वक गंगाभंडारमध्ये दिल्हे असे. आतां सरकारी आमील व कारभारी आहेत त्यांशी कोणे बिशयी गुंता नाहीं. वेळेस त्यांची मदत करीत जाऊं. दुसरे जो कोणी जहागीदार चाकर हुजुरीचाकरींत हाजीर नसला तरी त्यांची जहागीर जप्त करोन, सरकारांत दाखल करोन, आपली चौथ त्याशी घेऊं. आमच्याकडून करारमदारांत अंतर पडणार नाही. यानंतर जरी आह्मांस कांहीं कार्यानिमित्य देशी जाणें झालें तरी फौज हजुरे ठेऊन जाऊं, व वायद्याप्रमाणें हाजीर होऊं. याशिवाय, आमचे धर्म क्रियेची किती वृत्ती आहेत ते जारी राहात, कोणेविशी तक्रार न होय. तीस लक्ष रुपये अबदाल्लीचे पारिपत्या ब॥ इनायत केलें. त्यास, आवंदा अथवा पेस्तर सालीं ज्या वेळेस अबदाली येईल, आज्ञेप्रमाणें पारपत्यास हाजीर. परंतु चौथ सुभे पंजाब व मुलतान व थटा व भकर प्रो। नजीक काबिल व मुरादाबाद व संबळ व हिसार व बादाऊं ठराव झाले त्यापैकी दोन हिस्से सरकारांत आणि एक हिसा फौज हजूरची त्यास ठरविले. बंदोबस्त प्रांताचा केली वर चौथ आपली घेऊं. रसदा ब॥ जमीदाराकडे व राजें रजवाड्याकडे शिवाय रसदा सुभेदारी जे मुत्सदी हजूरचे त्यांचे जीमे लिहून देतील ते आह्मी तहशील करून देऊं, व त्यापैकी आपली चौथ घेऊन, बाकी सरकारांत पावती करू. यानंतर सुब्यांत व कमाविशींत दारोगा आदालतीचा सरकारीचा राहे आणि किल्लेदारही सुदामतीप्रो। सरकारचे वहाल राहात. किल्याचे खर्चावर्चाचा जिमा हजूरचा आहे. शेवकास किल्लेदारी वगैरे सरंजाम व बागांत व प्रांत पातशाहीसी दखल न करूं. भोगवटा प्रा। बंदोबस्त पातशाही ठेवून, शहरच्या लोगांस राजी राखून, पारपत्य बागी वगैरेचा मनोदयानुरूप करून. व्यापारी यांस राजी ठेऊं व जहागीरदार जहागीर खाऊन चाकरींत हाजीर नसल्यास त्यांची जहागीर जप्त करून सरकारांत हवाल करूं. त्यापैकीं चौथ आपली घेऊ. ऐसीयास, श्रीईश्वर व मार्तंड व सांब साक्ष आहे. त्यास विद्यमानें अमीरान हजूर पावले. पंत प्रधान बाळाजी बाजीराव व उभयता सरदार होळकर व सिंदे यांचे वंशांत कोणी हजूराशीं व नबाब बहरादराशीं बेहुकुमी व बेमर्जी करील त्यास ईश्वर मध्यें साक्ष आहे. पोथी बेलभंडार तुळशी गंगा प्रत्यक्ष साक्ष नबाब बहादर व रुबरु वकील व मुत्सदी सरकारचे होते. त्यासमई (+++++++++) * आहेत, तेथें दखल न करितां उपराळा व मदत हरएक विषयीं करित जाणें. सरकारी चाकरीत जो जहागीदार असे तो चाकरीत हजीर नसल्यास आज्ञा होईल तेव्हां जागा बंद करोन तीन हिस्से सरकारांत व एक हिस्सा तुह्मी घेणें. व पेशकक्षा पातशाही राजे व जमीदार व शिवाय सुभेदरी व फौजदारी जे मुत्सदी हजूरचे त्याचे जिम्मे लावून देतील ते तहसील करून, त्यापैकी आपली चौथ वजा करून, बाकी सरकारांत प्रविष्ट करूं. व फौजदारींत दारोगा अदालत हजूरचा राहील, व किल्लेदार हजूरचे राहतील, तेथील खर्चावेचाचा बंदोबस्त हजूरांतून होईल. तुह्मी किल्ल्याशी व जागीर किल्लेदारान व दिवाण वगैरे कारभारी पातशाही व आणीक सरंजाम व बागबगीचे व पातशाही प्रांतांत दखल न करणें. व शहरचे रयतेस राजी व रजामंद राखून पारपत्य शत्रूचा करीत जावे. व व्यापारीस राजी व खुशीनें ठेवावे कीं आमदरफ्त राहे व तुमचे शेवाचाकरीचा मुजरा हजूरांत नक्ष होय ते करावें. कृपा दृष्ट समजावी. +