श्रीशंकर शके १६७१ आश्विनवद्य २
रवाना छ १७ जिल्काद.
तिर्थरूप राजश्री बाबा वडिलाचे शेवेशी
अपत्ये दामोदरानें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशळ ता। छ १५ माहे जिलकाद, मुक्काम धुळकोट, नजीक बर्हाणपूर, वडिलांचे आशिर्वादें यथास्थित असे. विशेष. भादवा वद्य १० सोमवारचे आशिर्वादपत्र खास दस्तुरें जाबीकासदाबरोबर आश्विन सुदि १० मंगळवार अवंतीकेस पावलें. तेथें आज्ञा कीं:: खंडोपंत जाऊन भेटले. आमच्या नावें पत्र पाठविलें. पैठणावर त्याच्या तर्फेनें अबदुल हुसेनखान आणिलें. त्यांशी उदंड कांहीं बोललों, तूर्त त्यांस श्रीमंताच्या स्नेहाचे आगत्य तें गोष्ट आपल्या हातीं नाहीं. याकरितां वर्हाडी गोष्टी सांगून समाधान करून मार्गस्थ केले. जर शहराजवळ दोन तीन च्यार मजली असिले तर जाऊन भेटतो. नाहींतर, न जाणो, आह्मी आज सातार्यास जातों, तेथील अभिप्राय ध्यानास आणून तुह्मास लिहूं , ह्मणून आज्ञा केली. त्यास वडिलीं जें कांहीं भाषणें केलीं असतील तें उत्तमच केली असतील. अवंतिकेहून मार्गांत वरचेवर खबर पोहोंचली कीं, शहागडाजवळ गंगा उतरून दरमजल गेलें. लांबले. मग जाणें सल्हा न देखिली. पुढें परतल्यावर वडिलांचे मर्जीनुरूप पाहून घेऊं. टोंक्यापाशीं अगर पुण्यस्तंभाजवळ गोदा उतरून परभारें आधी वडिलाचे भेटीचा लाभ घ्यावा, मग श्रीमंत स्वामीचे से॥ जाऊन गावास यावें. ऐसा बेत होता. परंतु श्रीमंत सातार्यास गेले वडीलही श्रीमंतापाशी गेले. आह्मी ऐशाप्रसंगी जरूर यावें. परंतु आज्ञेखेरीज सातार्यास कसें यावें ? या संदेहास्तव नाशकास गेलो व हे पत्र वडिलांकडे पाठविलें. उत्तर येतांच स्वार होऊन शेवेशी येऊं. परंतु जोंवर वडील व श्रीमंत स्वामी सातार्यास अथवा पुण्यांत एकत्र आहेत तोवरच आम्हास बोलाविले पो। कीं, सर्व गोष्टीचा निश्चय होय. उत्तराची मार्गप्रतीक्षा आहे.