श्री पौ छ ६ रबिलाखर.
शके १६७० फाल्गुन शुद्ध १
श्रियास चिरंजीव राजश्री दादा यासी प्रति बापूजी महादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ १ माहे रबिलोवल, मुकाम नजिक करोखनगर कपिलाभागीरथीतीर वजिरान्मुमालिकाचें लष्कर, जाणोन स्वक्षेम लिहित जावें. विशेष. तुमचें पत्र छ ८ मोहोरमचें कलबुर्ग्याजवळील आलें ते पावलें. वर्तमान सविस्तर विदित जालें. रा॥ गोविंद तमाजी यांचा कागद आला होता, त्याजवरून सविस्तर विदित जालें असेल, ह्मणून लिहिलें. त्यासी, गोविंदराव तमाजीचीं पत्रांवरी पत्रें येत असतां तुमचें पत्र न आलें याचें कारण काय ? हें न कळे. जर त्याजवळी आलें असेल, तरी पोहोंचेलच. हौरंगाबादेहून दरमजल तुळजापुरास जाऊन देवब्राह्मणांस भोजन घालून देवीदर्शन करून लश्करास आला. नवाब नासरजंगास कळतांच त्यांणीं गुलाम महमदखां नामें सरदार पाठविला. जाऊन भेटलों. बहुतसा आदर केला. बहुमानवस्त्रें मेजमानी पाठवून बहुत शिष्ठाचार केला. बोलून बहुतच कुशल; पातशाहाची चाकरी करावी; वजीर इत्यादिकांसी स्नेह असावा; श्रीमंतस्वामीसी नित्यानीं स्नेह वृद्धिंगत व्हावा; मुलुकाचा बंदोबस्त असावा; प्रजा सुखी राहावी. आह्मी प्रसंगोचित पातशाहाकडीलं कृपेच्या, व वजिराकडील स्नेहाच्या, समर्पक गोष्टी सांगितल्या; त्यावरून बहुत संतोष जाहाला. दखणी रायांचा इत्का भरवसा नवता जे, इत्का कुशल आहे. अखेर असफज्याहाचा पुत्र आहे. पातशाहाचे पिलास पोहूं शिकावें लागत नाहीं. तुह्मी येवडा सरदार हातास आणिला. तीर्थरूप कैलासवासी यांचा मनोरथ पूर्ण केला. आह्मां त्रिवर्गांस पूत केले. ईश्वर तुह्मांस सलामत राखो ! छ ५ मोहोरमीं कृष्णनदी जवळून निरोप घेऊन, बहुत राजी करून, सातार्याकडून कूच केलें. औरंगाबादेहून दिढाशा कोसांवरी आलों. अतःपर सातारियासी पावल्यावरी श्रीमंत स्वामींची व तीर्थरूप बाबांची भेट घेऊन सविस्तर वर्तमान लिहून पाठवूं. ते प्रांतीचें वर्तमान लिहिणें. त्यासी तुमचेंच शरीर होय जे ऐसी ऐसी मेहनत केली. आह्मी फरुखाबादपर्यंत आलों आहे. इत्कियांतच इत्की क्लेश वाटतात, लिहिता पुरवत नाहीं. तुमचें सप्तर्षीस पावलियाचें वर्तमान येईल तेव्हां समाधान होईल. बहुतकाय लिहिणें ? हे आशीर्वाद.
१६७०
जे समईं पठाण सरहिंदेवर आला, इकडून कमरदीखां व सफदरजंग गेले, व श्रीमंत स्वामीच्या फौजा नेवाईवर आल्या, तेसमई रोहिल्याचें कामाचे शर्तीवर पांच पाउले मृत सार्वभौमासी ठराविले होते. ते पंचत्व पावल्यावर बाळच्या पादशाहासी व वजिरासी तागादा करीतच होतो. हे गोडगोष्टीनें टाळाटाळ करीत होते. हें वडिलास श्रुतच आहे. सांप्रत आह्मी दिल्लीहून चालणार तेव्हां बहुतां प्रकारें वजिरास समजावून सांगितले. पादशाहाचे घरांत तों पैका नाही. तेव्हां वजिरानीं अडिचा पावल्याची तनखा सांभेरवर केली व अडिचा पावल्याची बंगाल्यावर करून देतों ह्मणून नेम केला. व सांभरचा फौजदार आह्मांबरोबर दिधला जे, यास दखील करून, तुह्मी आपला एक ब्राह्मण व शंभर राऊत ठेवून, जो पैका येत जाईल तो शिबंदी फिटल्यावर आपल्या तनखाईत घेत जाणें. आह्मी विचारलें कीं, हे गोष्ट बहुत कार्याची आहे. अनायासे तनखाचे वाहाण्यानें सांभेरांत पाय पडिला ह्मणजे अजमेरच्या सुभ्यांत दखल जाला. बलकी सांभेरेंत बीं रुतल्यावर बखसी पासूनहि हर कोणाचे नांवे करून घेऊं. होत होत सर्व बंदोबस्त होईल. ऐसे ध्यानास आणून हे गोष्ट कबूल केली. सांभरच्या फौजदारास घेऊन जैपुरास आलों. सवाईजीस अनेकांप्रकारे समजाविलें. परंतु ते न मानीत. सहसा अमल न देत. त्यांस, मकारपूर्वकाचे स्नेहाचा मोठा भरंसा ! नाइलाज होऊन निरोप न घेतां उठून आलों. टोंकेंत पावल्यावर दोनेकसे राऊत जमा करून, फौजदाराचा नायब व आह्मी आपला एक भला माणूस परभारें सांभरेस पाठविला. जे दाबदुब करून अंमल घेयावा, सवाईचा विचार केवळ अविवेकी. हे गोष्ट ऐकतांच, दोन तीन हजार स्वार पाठविले. केवळ निग्रहासच पेटले.