पुरवणी १०५
॥ श्री ॥
शक १६६९
चिरंजीव राजश्री नाना यासी प्रति जनार्दन बाजी आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष. तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी, सदैव पत्र पाठवून संतोषवित गेलें पाहिजे. तीर्थरूप मंगळवारी बाहेर निघाले; आह्मीहि बरोबर निघालों. काय विचार काही कळलाच नाहीं. आमचे मतें तर उगीच भयप्रदर्शन करावें कीं, नासरजंग बाहेर निघाला. भाऊस देखील बाहेर निघावें लागलें. ऐश्या एकट्यानें करून निकाल काढावा, ऐसें आमचे मतें वाटतें. परंतु, तुह्मी काय मजकुर तो लिहून पाठविणें. विशेष काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.