॥ श्री ॥
शक १६६९ माघ शुद्ध १३
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावीं यासीं :--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥
बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. पत्र छ १० सफरचें पाठविलें तेंछ १२ मानहूस पावलें, लिहला अर्थ कळला. तुमच्या लिहिल्या प्रो। घाटाघर मुकाम होईल. व रा॥ बगाजी यादव यास आजीच रा॥ करून तुह्मीं तेथील वर्तमान लिहित जाणें. जाणिजे. चंद्र १२ सफर. काल बगाजीपंत खिजमतगार यांनी सर्व वर्तमान सांगितलें. येथून जें सांगणें तें आज यास सांगून, रवाना करून, सत्वरच तेथें पावतील. सक्स्तिर सांगतील तें ध्यानांत आणून करावें. सर्व गोष्टींत हेळसांड, व वार्यावर वरात, नवाब दूरंदेश असतां, व आह्मी तिळमात्र हाकाळवर अंतर आपलें तर्फेनें केलें नसतां, दाखवावी हें उचित नाहीं. नासरजंग बाहेर निघणार, या दबावानें कूच करून आह्मी पुढें गेलों तर, आह्मांस कोण पुढें पुसलें पाहिजे. अवाईनें व दबावणीनें कूच करून, दूर पळून जावयाजोगे असतील, त्यास मोगलाई आविर्भाव दाखवावे ! आह्मी सर्व प्रकारें श्रेय इच्छितं असंता एकाएकी पुढे आले; गरीब रयत लोक पळाली; आह्मांवर दबाव दिल्हा; माघारे हि गेलें. याप्रो। करणें हे स्नेहाचे रीतीस बरे दिसत नाही. पुढेहि दुरंदेशी ध्यानांत आणून, पोख्ती विच्यार करून, आमचें समाधान, रक्षून करावें. न करीत तर न करोत ! किल्ला आमचा नवाबांनी घेतली. पुढें एकाएकीं येऊन दबावहि नवाबांनीच दाखविला. सांप्रतहि स्नेहाविसीं पुर्ता आदर दिसत नाहीं. तर वरकडाप्र॥ केवळ आमची हेळसांड करावी हें त्यास उत्तम नाहीं. कोणाचा काय वकूब व प्रमाणिकता, हे नवाब पुर्ते जाणतात. सविस्तर बगाजीपंत सत्वरच येऊन आपणास सांगतील.
( लेखनसीमा )
३७