॥श्री ॥
शके १६६९ माघ शुद्ध ९
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यासी:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥
बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मी पत्र छ सफरचें पाठविलें ते छ ७ मीनहूस प्रविष्ट जालें. नवाबाची आमची बोली ज़ाली. नवाब ह्मणाले कीं, आमच्या चित्तांत बिघाडाचा मजकूर किमपि नाही; आह्मी हवेली दाखल जाहलों. अतःपर पंतप्रधानांनी आपल्या कार्यास जावे. ह्मणाले येथें विनाकार्य उगेंच राहून नफा काय आहे ? राहावें ऐसा अर्थ नाहीं. आज्ञा जाहल्यास आह्मी नवाबाचा निरोप घेऊन येऊन. ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, नवाब बोलले तें यथार्थ आहे. त्यांच्या चित्तांत दुसरा अर्थ नाहीं. तदन्वयें आमचाहि नवाबासी दुसरा विचार काय आहे ? नवाबापासून उमदीं उमदीं कामें करून घ्यावीं हे उमेद आह्मास फार आहे; व आह्मांपासूनही बहुत कामें करवावीं हें नवाबासी जरूर आहे. ये समयीं न जाहलीं तर त्या गोष्टीवर मौकुफ काय असे ? नवाबाची आमची भेट व्हावी; परस्पर गोष्टमात होऊन, कितेक गोष्टी उभयपक्षीं नफ्याच्या व उपयोगाच्या व्हाव्या; त्या न जाल्यातर काय ? पुढें त्यांच्याच संतोषानरूप ज्या कालीं होणें त्या कालीं होतीलच. एतद्विषयीं तुह्मी नवाबास संतोष व उचित बोलणें तें बोलोन, नवाचा निरोप घेऊन येणें. उगेंच तेथें कशास राहणार ? आह्मी कोल्हार भगवती येथून कुच करून, पुणतांब्यावर जाऊन तेथून भादलीच्या ओढ्यावर जाऊन, तेथून कासारबारी उतरून जाऊन तर तुह्मी कासारबारीच्या रोखें येणें. जाणिजे. छ ७ सफर. बहुत काय लिहिणें ?
(लेखन सीमा )