श्रीशंकर.
पै॥ छ २१ रबिलावल.
शके १६६९ अधिक चैत्र शुद्ध १४.
राजश्रियाविराजीतराजमान्यराजेश्री बापू व राजश्री दामोधरजी स्वामीचे सेवेसीः-
पो। लक्ष्मण शंकर सा। नमस्कार विनंती उपरी येथील वृत्त अधिकचैत्र शुध १४ मु॥ अमरपुर स्वामीचे कृपेकरून यथास्थित असो. विशेष. बहुत दिवस झाले पत्र पाठवून परामर्ष न केला, हें उचित नव्हें. कैलासवासी महादेवभट्टभाऊ आम्हांवरी कोणेप्रकारें कृपा करीत होते हें तुम्ही जाणत असतां आम्हांवरी निष्ठुरता झाली आहे. तुमचा उत्कर्ष ऐकोन परमसमाधान होत आहे. आम्ही सर्व प्रकारें तुमचे पदरचे जाणोन सदैव परामर्ष करीत असावें. लष्करासमागमें सरदेपर्यंत गेलो होतों. येथून रा॥ उभयतां सरदार व रा॥ बाबास्वामींनीं आह्मांस इकडील पारपत्यास ठेविलें आहे. इकडील कार्यभागाचा बंदोबस्त जेष्ठ आषाढपर्यंत लागतो करून श्रीयात्रेस सडे जावें ऐसा निश्चय आहे. स्वामींनी पूर्वी दस्तकें त्रिस्थलीची पो। होती. परंतु बुंधेल्याचें बेमानास्तव जाणें न जालें. प्रस्तुत लि॥ प्र॥ इकडील कार्यभाग नेमस्त करून जावें हे मानस आहे. याकरितां कृपा करून त्रिस्थळीचीं साहित्यपत्रें व दस्तकें घेऊन, माणसें, पडदाळें, पालखी समागमें जितका यात्रासमुदाय येईल इतकियांचा उद्धार करून यात्रेचीं साहित्यपत्रें पाठऊन यात्रा सुरक्षीतपणें होऊन येतें केलें पा।. पदरचें जाणोन ममतेस अंतर न करितां सदैव सांभाळ करावा. आपला कुशलार्थ निरंतर पत्रद्वारें पाठवीत जावें. बुंधेलखंडची मजमूची नेमणूक आहे, हें कोणाजवळी प्रविष्ट करावी हें लिहिलें पाहिजे. कृपा असों दीजे. हे विनंती.