॥ श्रीशंकर ॥ शके १६६७ आषाढ शुद्ध ५
श्रीयासह चिरंजीव राजश्री पुरुषोत्तमजी व दिवाकाजी यांस प्रती दामोधर महादेव आसीर्वाद उपर येथील कुशल ता। छ ३ जमादिलाखर मु॥ प्र॥ भेळसे लशकर श्रीमंत राजश्री पंतप्रधान जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. बहुत दिवस जाहलें तुमचें पत्र देऊन वर्तमान कळत नाहीं. तेणेंकरून चित्त उद्विग्न आहे. तर सदैव पत्र पाठवून कुशालार्थ लिहित जाणें. आह्मी पातशाही लष्करांतून सार्वभौपासून रुकसत जाहलों. रुसकतीचे समई श्रीमंतास, हत्ती, व घोडा, व खिलत, जवाहीर व फरर्मान ईनायत केला. व आह्मांस हत्ती, खिलत व मोत्याचा चौकडा देऊन रुकासत केलें. तेथून दिल्लीस येऊन तीर्थस्वरूप बापूची आज्ञा घेऊन लष्करांत आलों. श्रीमंताची बुंदेलखंडांत भेट जाली. परर्मानवाडी उभी करून पातशाही ईनायत घेऊन बहुत खूष जाहलें. तदोत्तर बुंधेल्याची मामलत करून देशाकडे कूच केलें. मजल दरमजल देशास येतात आह्मी समागमच देशास येतों. ईश्वर इच्छेनें थोडकियाच दिवसांत गांवास येऊं. कळलें पा।. तीर्थरुप बापू पातशहापाशीं सुखरूप आहेत. पातशाहाची व सर्व अमीरांची कृपा विशेष आहे. व येथेंही श्रीमंतांची व सरदारांची कृपा बहुत आहे. सविस्तर तुह्मास कळावें ह्मणून लिहिलें असे. बहुत काय लिहिणें हें आशिर्वाद.
राजश्री त्रिंबकपंतास नमस्कार. यादोपंत दिल्लीस सुखरूप आहेत. कळलें पा।. थोडकियाच दिवसांत भेट होईल. भेटीनंतर सर्व कळेल. बहुत काय लिहिणे ? हें विनंती.
से॥ वेणाजी त्रिंबक सा। नमस्कार विनंती. आह्मींही समागमें आहों. भेटीनंतर सविस्तर विदित होईल. मातुश्री काकू व आकास सां। नमस्कार सांगणे. कुपा केली पाहिजे. हे विनंती.
मातोश्री काकू व मातोश्री आक्कास सां। नमस्कार. विनंति. सत्वरींच सेवेसी दर्शनास येतों. भेट होईल तो सुदिन आहे. हे विनंति.