॥ श्री ॥
शके १६६६, आश्विन वद्य ३
राजश्री पिलाजी जाधवराऊ गोसावी यासी.
अखंडित लक्ष्मि अलंकृत राजमान्य स्ने॥ बसवंतराऊ खासखेल रामराम विनंति येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पवोन बहुत समाधान जाहालें. ऐसेंच सदैव पत्र पाठवून परामृश करीत गेलें पाहिजें. आपणांस नारू जाहाले आहेत ह्मणून लिहिलें. तेणेंकरून चित्तास फारसे श्रम जाहले. बरे शरीर भोगास उपाय काय आहे ? सत्वर वोषधी उपाय करून बरें करून घेऊन आरोग्यतेचें पत्र पाठविलें पाहिजे; तेणें करून चितास संतोष होईल. आपल्या दर्शनाचा हेत बहुत आहे. भेट होईल तो दिन सुदिन असे ! दरबारचें वर्तमान प्रस्तुत यथास्थित असे. पुजाजी जासुद याबरोबर वर्षासनाबाबत रुपये ३०० तीनशें पाठविले ते पावले. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
वर्षासन सन खमस ११५४ पाठविलें—त्याची पावती आली छ. १७ रमजान.