श्रीशंकर पौ॥ छ २२ रबिलाखर
शके १६६६ वैशाख वद्य १
श्रियासह चिरंजीव राजश्री बापूस महादजी गोविंद अनेक आशीर्वाद उपर येथील कुशल ता। छ १३ माहे रा।वल मुक्काम इंद्रप्रस्त जाणोन स्वक्षेम लिहिणें. विशेष. फार दिवस जाले, तुह्मांकडील पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. यास्तव, रात्रंदिवस चित्त सापेक्षित आहे. वरचेवर वर्तमान लेहावयास आळस नकरणें. इकडील वर्तमान तरः- पूर्वी तीन जोड्या तुह्मांकडे रवाना केल्या. सविस्तर वर्तमान लिहिले आहे, त्याजवरून विदित जाहालें असेल. सांप्रतचें वर्तमान श्रीमंत स्वामींचे सेवेसी लिहिलें आहे, त्याजवरून विदित होईल. इतके दिवस तों रघोजीच्या भेटीकरितां व गयेहून स्वार जाल्यावर, कितीका शहारोशहरीच्या जागा मारल्या व खंडण्या घेतल्या. कितीका भल्या माणसांनी कबिलेसुद्धां जोहार केले; वेगळिया गढीसी झुंज केलें. यास्तव जनामध्यें विरुद्धताच भासली. सार्वभौमासहि लोकांनीं नानाप्रकारें विरुद्धच जाणविली. इतक्यांत, समाचार आला कीं.:- माहामत जंगासी व श्रीमंत स्वामीसी भेटी जाल्या; स्नेह शपथपूर्वक जाला; श्रीमंत खजीन्याचीहि ताकिद केली व रकारनामकाचे पारपत्यासही सिद्धता केली आहे. ऐसें वर्तमान आल्यावर, पादशहास व वजिरास कांहजींक भरोंसा जाला आहे की, बाळाजीराव एकनिष्ठ आहेत; रघुजीस तंबी करतील. ऐसा विश्वास आला आहे. जे कोण्ही अन्यविचार भासवीत होते ते शरमिंदे जाले, फजित पावले. ईश्वरइच्छेने आजपावेतों रकारनामकाचें पारपत्य जालें असेल, इतकेच वर्तमान आलें. व खजाना येतो, इतकें पत्र मुरीदखानाचें पावलें, ह्मणजे केल्या कर्माचे सार्थक जालें, श्रीमंताचा मुजरा जाला, इतबारहि वाढला. हें वर्तमान सत्वर आह्मांस पावें तें करणें, चिरंजीव दामोदरजीनीं चांदोरीचें वर्तमान लिहिलें होते, तें पत्र बजिनस तुह्मांपासी पाठविलें आहे, त्यावरून विदित होईल. प्रस्तुत तर, चांदोरीच्या कामाचा बंद न बसला. ईश्वरइच्छेनें श्रीमंत साहेबहि त्या प्रांतांस येतात. आह्मी येऊ. सर्व कार्यसिद्ध होईल. चिंता न करणें. देशास जावयाचा हेत अहे. तुमची कुशालीची पत्रें चित्तानरूप आलीं ह्मणजे स्वार व्हावयाची पैरवी करून. चित्तांत आहे कीं, वैशाख वदेंत मातुश्रीस पुढें स्वार करावें; मागून आपणहि उदेग करावा. एक हेत आहे. ऋणानुबंधे पाहावें कैसा योग घडूत येतो ? भाईभटहि वैशाखशुद्धांत दिल्लीस आले. मातुश्री बराबर माग्तां देशास रबाणा करावे, ऐसा हेत आहे. वोडशेकरानें मल्हार कृष्णास दगा करून मारिलें; नागो महादेऊ व अंताजी कृष्ण वगैरे दाहापाच ब्राह्मण व शेसवासे माणूस बारगीर व पोरगे, चाकर नफर कुल कापून काढले. धोडीं पिढीं मालमत्ता लुटिले. झांशीस वेढा घातला आहे, पर्वतावर धोंडो दत्ताजी आहे, तो तोफा सेडितो. रंतु बाहेरून कुमक पोहचत नाहीं. पाहावें, काय होईल ! गोविंदराऊ सखाजीचें पत्र एतद्विषयीं आलें होतें, तें बजिनस पाठविलें आहे; त्यावरून, व श्रीमंतास लिहिलें आहे त्यावरून, सविस्तर वृत कळेल. गोविंद सखाजीच्या पत्रीं व बाळाजी मोरेश्वराच्या पत्रीं तों परिच्छिन्न लिहिलें आहे कीं, मल्हारपंताचा पुत्र व जांवाई हीं दोन्ही मुलेंहि वोंडशांतच होतीं, त्यांसहि जिवें मारिलें. ह्मणून लिहिलें आहे. व पिलाजी जासुद-पंधरा दिवस जाले कीं-बाडशाहून आला तो जबानी सांगत होता जे, मल्हारपंत वोंडशांत होते व खंडोबा व मल्हारपंताचा जावाई झांशीच्या किल्यावर आहे. ऐसें सांगत होता, याजवरून कांहीक उमेदशी जाली कीं, जर किल्यावरच हें दोन्हीं मुलें असतील तर वांचलीं असतील. ह्मणोन पिलाजी जासूद मागती झांशीस पाठविला आहे. जर त्या मुलाचें आयुष्य बलवत्तर आहे, व पोरीचें सौभाग्य दृढ आहे, तर कुशल वर्तमान येतच आहे; त्याचक्षणीं तुहांस लेहूं. नाहीतर; सर्वस्वें घात तो जाला !
*****ची हळहूळ प्राप्त जाली. अद्यापि हें वर्तमान मातुश्रीस कळूं दिधलें नाही. परंतु कोठवर लोपवावे ? दोन च्यार दिवस आगें मार्गे कळेलच. शोकार्णवांत बुडाले. भगवत इच्छा प्रमाण ! कोण्ह्याहि राजाने असा घात व दगा श्रीमंताचे लोकांशी केला नव्हता, ऐसा वोंडसेकराने केला. एक झांशीच्या पर्वतामुळें इतकें जालें ! त्याचें पारपत्य करणार श्रीमंत समर्थ आहेत. काळेंकरून सर्व होईल. परंतु मल्हार कृष्ण अर्थे प्राणें लेंकरांबाळांसी स्वामीकार्यावर मारला गेला ! तव्हडें मूल तरी प्राणें करून वांचलें असलें तर कृतार्थ मानू. जो समाचार येईल तो लिहून पाठवून. * हा आशीर्वाद.
राजश्री वेणाजी पंतास नमरकार उपर. लेहलें परिसोन वर्तमान वरचे वर लिहिणें. हे विनंति.
उभयथा स्वामींचे पोष्यें त्र्यंबक मलारी साष्टांग नमस्कार विनंति लिखितार्थ परिसोन दया निरंतर असो . हे विनंति. पै॥ छ २२ रबिलाखर