॥ श्री ॥ शके १६६५
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री महादेवभटजी स्वामी गोसावी यासी:-
पोप्य रामाजी मल्हारी कृतानेक दंडवत प्रो। विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष. आपणाकडील बहुत दिवस पत्र येऊन वृत्त कळत नाहीं. तर ऐसें नसावें. सदैव पत्र पाठवून कुशलवृत्त लिहीत गेलें पाहिजे. आपण श्रीमंतास पत्र पाठविलें, त्यावरून अर्थांतर कळों आलें. इकडील वर्तमान तरी, नबाब अबदुलअजीजखान याच्या पारपत्यानिमित्य संगमनेरास आले. यास अबदुल अजीजखान सलाबतखान उजनेस गेले. त्या उपरी सोभागसिंग पेठकरी याचे लबाडीवरून किल्ले बितिंगियास वेढा बसविला आहे. किल्ला अजी पंचवीस रोज उत्तम प्रकारे भांडत आहे. किल्ला इतके दिवस नबाबाचे सलाबती खालीं टिकावा, नबाबाच्या फौजेसी लडाई करावी, ऐसा नव्हता. परंतु ईश्वरास नवाबाचा गर्व उत्कर्श न साहे. याजकरितां श्रीमंतांचे प्रतापें करून किल्लेकरी हिंमत धरून झुजत आहे. पुढें होईल वृत्त तें आपणास लेहून पाठवूं. सारांश बिर्तीगकरांनी शर्त केली ! नवाबांनीं किल्ला घेतला तरी, नवाबाची तरीफ नाहीं, व यांची अपकीर्ति नाहीं ! रा॥ धोंडो गोविंद विवेक-गोड गोष्टी सांगून करावयास गेले आहेत. होईल वृत्त ते लिहून पाठवून. तुह्मी पर्जन्य-कालीं येऊं लागल, तेव्हां चंदेरीकडील ताट १ व वाट्याचे जोड २ रुप्याचे घेऊन येणें. पैका देऊन. व उंटीण एक आणिली पाहिजे. बहूत काय लिहिणें ? कृपा असो दीजे. हे विनंति.