[ १६५ ]
श्री. शके १६६५ कार्तिक वद्य ६.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यासीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नो। रघुनाथ बाजीराव आशीर्वाद. सु॥ अर्बा अर्बैन मया व अलफ. शहरीहून गेंद, मुसनफासले, जिन्नस-घोड्याचें सामान–राजश्री जिवाजी गणेश याजकडील कारकून पाठवून आणविला, तो शहरांतून बाहेर आला. बराबर सरकारचें दस्तक आहे. ऐसें असतां तुह्मांकडील कमावीसदार यांणी जकातीबद्दल जिनस खराडास अडकावून ठेविला. माणसें माल ठेवून येथें आली. त्यांणी हें वर्तमान सांगितले. दस्तक असतां माल अटकाव हे अपूर्व गोष्ट आली. हालीं तुह्मांस पत्र लिहिलें आहे तर, कमाविसदारांस फजीत करून, पत्र लेहून, आपले जासूद पाठवून, जिन्नस आणून पाठवून देणें. याउपारि त्यास फजित करून ल्याहावें कीं, दस्तकानें माल येईल त्यास खलेल केल्यानें बरी गोष्ट नसे, ऐसें लिहिणें. जाणिजे. रवाना छ. १९ रमजान. ( लेखनसीमा. )
कंचनवडाचे कमाविसदारांनी जकात घेतली ते फिरून आणवणें. माल सिताबीनें येई ते गोष्ट करणें. ( लेखन सीमा. ) ( लेखन सीमा. )
० श्री ॅ
राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाळाजी बाजीराव प्रधान.