[ १६३ ]
श्री. शके १६६४ फाल्गुन शुद्ध १२.
चिरंजीव राजश्री माहादोबास. प्रति खंडो गोमाजी आशीर्वाद उपरि येथील कुशळ ता। छ. २५ मोहरम मु॥ निळेरा प्रांत वोडसें सुखरूप असो. विशेष. तुह्मीं पत्र चोविसावे जिल्हेजचें पाठविलें तें पावलें. वर्तमान कळों आलें. इकडील वर्तमान तीर्थस्वरूप राजश्री रायांनी लिहिलें आहे, त्यावरून कळों येईल. चिरंजीव राघोबा, मैराळ, बाबाजी, कृष्णाजी, गोविंद घोडीबारगीर, चाकर सहवर्तमान सुखरूप आहेत. निंबाजीपंत, बाजीपंत, सखाराम, नारो रघुनाथ, नरहर जिवाजी, उभयेतां अपाजी जगथाप व चिमाजी जगथाप, राणोजी उभयेतां व मल्हाजी, बापुजी, भवानजी, समस्त सासवडकर जगथाप वगैरे बेजारकरी सुखरूप आहेत. मातुश्री ताई वाराणसींत सुखरूप आहेत. त्यांचीही पत्रें आलीं होती. गयेस गेली होतीं, आली आसतील. माघस्नान यंदां जालें नाहीं. पुढे करून येतील. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. हे आशीर्वाद. चिरंजीव धोंडोबास व नानास आशीर्वाद. उपरि लि॥ परिसीजे. तुमचा राणोजी शिंदा बारगीर मेला. गोळी गालावरी लागोन पडला. कळलें पाहिजे. वरकड अवघे सुखरूप आहेत. हे आशीर्वाद.
राजश्री सदाशिवपंत व राजश्री त्रिंबकपंत, यांस साष्टांग नमस्कार. विनंति. उपरी लि॥ परिसिजे. वारंवार तुह्मांस ल्याहावें ऐसें नाहीं. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
राजश्री राघो जिवाजी यास नमस्कार. विनंति. उपरि. तुमचे भगवंत जिवाजी सुखरूप आहेत. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.