[ १४० ]
श्री. शके १६६१ आषाढ शुद्ध १३.
राजमान्य राजश्री गोविंद खंडेराव चिटणीस यांसी आज्ञा केली ऐसी जे, तुमचे वडील पूर्वी स्वामीचे उपयोगी पडले. व खंडेराव बल्लाळ यांनी दिल्लीपतीचे लश्करांतून स्वामी येतां मार्गी येऊन कितेक प्रकारें चाकरी केली; ती ध्यानांत आणून परम विश्वासुख जाणून लहानथोर कामें सांगावीं, अशी योजना केली असतां, मी कुटुंबवत्सल; माझे पदरीं पोरवडा; आजीपरयंत श्रम स्वामीच्या चरणांजवळ केले. पुढें आस्था, पायाचा वियोग न होतां धंदा लेकरांचे लेकरीं चालवावा; दुसरा लोभ नाहीं; असें शफतपूर्वक बोलल्यावरून, त्यांनी राज्याकरितां दु:खें भोगिलीं तीं स्वामींनीं आयकून घेतली. परंतु कामकाज सांगावें हें मनांतच राहिलें. खंडेराव कैलासवासी जाले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र जिवाजी खंडेराव सरकार उपयोगी पडतील तर, त्यांजला लिहिण्याचा कसाला होईना. सा। सर्व तुमचे माथां ओझें स्वामीच्या राज्यासह पडलें असतां जातीने सेवा करून प्रपंचहि पाहिला. स्वामी तुह्मांवर कृपाळू होऊन कारभाराची वस्त्रें देत असोन घेतली नाहीं. आज्ञेप्रों। कार्यभाग उलगडले. तिलप्राय फुरसत न पडे; हें पाहून राजश्री मोरो शिवदेव, तुमचे गुमास्ते लिहिणार, यांजला तुमचे विनंतीवरून लिहिण्याविसीं परवानगी सांगितली; आणि तुह्मांपासोन दौलतीची कामें घेतली. त्यांत तुह्मी स्वामीपासोन मागोन घ्याल ह्मणून मार्ग पाहिला; परंतु कांहींच न मागितले. त्यावरून परम विश्वासुख निःकपट सेवा तुमची जाणून हें पत्र तुह्मास लेहून दिल्हें असे. तर तुमचे परंपरेनी चालविण्यास स्वामींचा वंश अंतर करणार नाही. व तुह्मी सेवा करीत आल्याप्रों। पुढें करीत जाणें. जाणिजे. छ. ११ रबिलाखर सु॥ अर्बैन मया व अलफ. तुमची सेवा बहुत. स्वामी तुह्मांवर संतोष होऊन हे लिहून दिलें. तर स्वामीचे वंशीचा असेल तो सेवा घेईल; तुमचे वंशास अंतर देनार नाहीं. बहुत काय लिहिनें ?