[ १२७ ]
श्री. शके १६६० पौष शु॥ ५.
राजश्री सटवोजी जाधव गोसावी यांसि :--
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नो। चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ तिसा सलासीन मया अलफ. रामनगरकर राज्यांस आह्मी भेटीस बोलाविलें आहे. ऐशास, तुह्मी बादलापारडीस खटपट करावयाचा उद्योग केला असेल, तरी रामनगरकर राज्यांसदेखील तुह्मी आपणाजवळ ठेऊन घेणें; आणि काम सिद्धीस नेणें. तैसेंच रा। रायाजी शंकर यास कार्य असिलें तर ठेवणें. ते राहातील. जरी तुह्मी तेथील कार्यास उपक्रम केलाच नसेल, तर मग विना कार्य मशारनिल्हेस ठेवावेसें नाहीं. पाठऊन देणें. डहाणूजवळ डोंगर बांधावयाचा आहे तो बांधतील. सारांश, तुह्मी बादलापारडी जेर करावयाचा उद्योग केला असेल तरी व रायाबा तेथें असावेसें असेल, तरी मशारनिल्हेस ठेऊन घेऊन काम करणें. जरी रिकामे असले तर पाठऊन देणें. जाणिजे. छ. ३ सवाल. + बहुत काय लिहिणें ? गल्ला विकावयास पाठवण्याविशीं तुह्मीं वारंवार रा। देवजी ताकपीर यास पत्रें पाठविलीं असतील; व येथून पत्रें त्यांचे नांवें पाठविलीं होतीं, तींहि त्यांजकडे रवाना केलीं असतील. त्यावरून मुलखांत ताकीद करून गल्ला विकावयास रवाना करविला किंवा न करविला ? जाबसाल काय लिहिला ? तें वर्तमान लिहिणें ?
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहू नरपति
हर्षनिधान बाजीराव
बल्लाळ प्रधान.