[ ९० ]
श्री. शके १६५५ पौष शु॥ ६.
* ० श्री ॅ
राजा शाहुनरपति
हर्षनिधान बाजीराव
बल्लाळ मुख्य प्रधान.
मा। अनाम देशमुख व देशपांडे कर्यात सासवड यांसिः--
बाजीराउ बल्लाळ प्रधान सुहूरसन अर्बा सलासीन मया अलफ.
मौजे बेलसर कर्यात मजकूर येथें कृष्णजी गरुड व नाहावी याच्या घराची कजिया आहे, ह्मणून तुह्मीं पेसजी लिहिलें होतें. व हाली, हे उभयतां येऊन हुजूर अर्ज केला कीं, गांवचे बारा बलुते जमा करून, दशरात्र पंचरात्रीची क्रिया नेमून, त्यांचे क्रिया घेऊन, माहाराचे डोईवरी श्री देवीचा अंगारा व पांढरीचा भेंडा देऊन, नाहावियाच्या घराचा जागा पुरातन असेल तेथवरी जाऊन, उभा राहेल त्याप्रमाणें या उभयतांचा कजिया वारून देणें. येविशीं राजश्री नारा दादाजी यास तेथे जाण्याची आज्ञा केली आहे. तरी, ते व तुह्मी मौजे मजकुरास जाऊन, नाहावियाच्या घराचा कजिय वारून देणें. हुजूरून रा। श्रीनिवास केदार पाठविले आहेत. याच्या विद्यमानें उभयतांचा कजिया बहुत चौकशीनें निवाडा करून हुजूर लिहून पाठविणें. हुजुरून आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तणूक करणें. जाणिजे. छ० ६ साबान. आज्ञाप्रमाण.
लेखन
सीमा.
.