[ ८८ ]
श्री. शके १६५५ आश्विन.
पुरवणी राजश्री साबाजी प्रभु चिटणीस व राजश्री अंताजी बावाजी गोसावी यासी :--
उपरि. पत्र कमलोजी शेटगे याजसमागमें पाठविलें पावलें. लेखनार्थ कळला. आज्ञापत्रें सादर जालीं; शिरसा वंदिली. आज्ञेप्रों। वर्तणूक करित आहों. माहाराजांचे पुण्य समर्थ असे. सविस्तर रा। महिमाजी आंगरे व लक्षुमण आंगरे यांचे पत्रावरून कळलें ह्मणून लिहिलें. अक्षरशा श्रवणारूढ जाहालें. व चिरंजीवाचे पत्रावरून साद्यंत अवगत होऊन आले. त्यास, चिटणीसबावा खुद तुह्मीच खासा प्रतिमा गेले आहां. तेथें न्यून पडो द्याल व घेयाल हें होणेंच नाहीं हा निशाच आहे. पेलवानीस व युक्तीस एकंदर न चुकतां हारीस नेटबाजी बोलीचालीची करून नडो न देणें. बोलीचालींत काईल करावयास व. त्याचे त्याचे पदरी घालावयास, संलभ्य करायास न चुकणें. अंतर कोणाकडील हें खरें करून पदरी घालणें. पुढें काय विचार ? हाहि सोधून पाहोन लिहिणें. वरकड सविस्तर चिरंजीवाचे पत्रावरून कळेल. स्वकार्य साध्य होऊन येई याच पैरवींत लागले आहां; व निसीम लागोन लवकर उलगडा उलगडोन यावयाचें करणें. कापडाविना व खर्चाविना लोकांची मोठीसी हैराणगत जाली असे. व आरब रोजमुरदार वगैरे रोजमुरदार यांचे देणें चालते माहापासोन मागील गेला महिना देखील थारलें असे. यास्तव रात्रंदिवस चैन पडत नाही. याचा कसा काय विचार तो लिहिणें. चार जातीस तो पावलें पाहिजे. लग्नकरी यांचाहि गवगवा. याजकरितां, आपले पतीवर कर्जवामाचा, विचार तर्ही करून देणें. रा। सुंदरजी प्रभु व मोरो विनायक व पुतळाजी जिवाजी सारखे समागमें असतां वेढे काय ह्मणून लागले ? आण जमलें त्याचे बेतानें कांहीं विचार करून घेणें व कापडाचा सरंजाम, समजाविसी कापड, व वाडियांतील बेगमेची बुतडी, याप्रों। कृष्णाजी नाईक व नथावा नाईक, आदिकरून सर्वांस समाधान करून सांगोन हे प्रसंगी कांहीं तर्ही उपेगास येत ऐसें करणे. तोहि सरंजाम लवकर येऊन पावे ऐसें करणें. सालमजकुरचे चेऊल प्रांतांतील व नागोठणेकडील गल्याचा अजमास खर्चाचा व जमेचा सुमारीचा पाहून पाठविला असे. पंधराशे खंडी पावेतों तोटा येईल. वीस खंडांची खरिदी दिसते. पुढें विचार काय ? तें लिहिणें. हे विनंति.
मोर्तब
सुद.