[ ८७ ]
श्री. शके १६५५ आश्विन शुद्ध ८.
पुरवणी राजश्री साबाज़ी प्रभु चिटनीवीस गोसावी यांसिः-
उपरि, शामळाचे कलहावरून समीपवर्ति मामलेदारी दुर्बुद्धीस प्रवर्तोन शामलाचें निमित्य पुढें करून, तमाम प्रांत उद्वास केलियाचें वृत्त तुह्मांस लेहून गेलेंच आहे. वरकड, शामळाची कुवत होती ते कळलीच होती ! असो ! जें जालें तें उत्तमांतच मानोन, सांप्रत शामळाचा दुराग्रह थळचे कोटाविसी आहे. त्याविशीं इंग्रेजांस मध्यस्त ह्मणोन भीड घालोन स्थळ विच्छिन्न करावयाचा संदर्भ लावला. खारियावाडियांचा दुराग्रह दूर होईल ऐसा अर्थ पाहून, शामळाचें सौरभ्य करून घेतल्याविना मुलकाची आबादानी व माहास्थळाचा सरंजाम होणार नाहीं. राज्यभारियाचा भरवसा तरी कनिष्ठांचा विचार सर्व तुह्मी लिहितच आहां. तोहि विचार ध्यानात आणून मनसबियाचे विचारें माहास्थळाचे बेहबुदीचा विचार असेल तो पाहावाच लागतो. ऐसे चारी विचार चित्तांत आणून, जागा विच्छिन्न करावा ऐसा करार करून, शामळाचें उपशमन व्हावें ऐसा ठराव करून, इंग्रेजांस जाबसाल होऊन निश्चय जाला आहे. शामळ आह्मी समजलों, जागा दूर केला, यावरून मामलेदार नानाप्रकारें इस्किल घालून लिहितील; उभयतांचे चित्तांत किंत घालतील. याजकरितां तेथें उभयतांस श्रुत होऊन तुमचें उत्तर येई इतका अवकाशाचा करार केला आहे. वरकड उभयतास पुसावें. असेंहि अंत्र पहातां, जेष्टांहीं साक्षी-उपसाक्षींत वानर्याचे कोटाचा दाखला देऊन तुह्मांस जाबस्वाल केलाच होता. तथाप पुसोन केला ह्मणजे बरें. यास्तव तुह्मास लिहिलें आहे. कदाचित् तेथून अनमा नाचीहि गोष्ट असली तरी, शामळामी कलह असल्यास कार्याचें नाहीं, हेंच प्रमाण असे. परंतु दोन्ही गोष्टी रक्षाव्या ह्मणोन सविस्तर लिहिलें आहे. तेथील आज्ञा व तुमचा विचार कळला पाहिजे. तदनुरूप कर्तव्यार्थ घडोन येईल. तुर्त कलह स्तब्ध पाडून घेतला आहे. व मुलकांतील रयत परागंदा जाली आहेत, जागाचे जागा येऊन आबाद होय, ऐसाच विचार केला आहे. पत्रें तुह्माजवळ जाऊन पावतांच उत्तर अविलंबे पाठवणें. जाणिजें. रा। छ. ७ माहे जमादिलोवल. बहुत काय लिहिणें ? उभयता दाजींस पत्रें लिहिली आहेत. आपले विचारास आलीं तर प्रविष्ट करावीं; नाहीं तर न द्यावीं. तुमचे विचारास कसा काय विचार येतो तो सत्वर लेहून पाठवावें. जाणिजे. छ. मजकूर.
मोर्तब
सूद.