[ ८६ ]
श्रीमोरेश्वर. शके १६५५ अधिक आषाढ
शु॥ १५ शनवार.
छ० १६ मोहरम सोमवार
दोनप्रहर.
श्रीमंत राजश्री दादोबा स्वामी गोसावी यांसिः--
सेवक बाबुराऊ विश्वनाथ कृतानेक नमस्कार विनंति. उपारि. येथील वर्तमान तरः पांडुरंग गोविंद परभु राजश्री स्वामींनी जंजिरियास पाठविला होता. तो काल शुक्रवारी संध्याकाळी आला. त्यानें वर्तमान निवेदन केलें की, राजश्री पंतप्रधान शामळास सांगोन पाठवितात कीं, तुह्मीं चिंता न करणें, तुमचें अधिष्ठान मोडित नाहीं, आपण कांहीं तुमच्या वाटेस जात नाहीं, पाहिलेयानें आपण कांहीं येत नव्हतों, परंतु खावंदाच्या आग्रहास्तव आलों, परंतु तुह्मीं कोणे गोष्टीची फिकीर न करणें.
आपण तुमच्या वाटेस जात नाहीं. ऐसें शामळास सांगोन पाठवितात. तेणेंकरून शामळ खुशाल आहेत. जंजिरियांत मनुष्य तर पांचशें आहे. ऐसें सामान्य वर्तमान पांडुरंग गोविंद याणे राजश्री स्वामीजवळ सांगितलें. तेणेंकरून बहुत श्रमी जाले. राजश्री नारबावाहि बहुत श्रमी जाले की आजपर्यंत कोंकणस्थांचा लौकिक बेरा जाला. परंतु या गोष्टीनें भ्रम गेला. याजकरितां श्रमी आहेत. येथें तजवीजा होत आहेत कीं राजश्री स्वामी आपण खुद्द रायेगड़ी राहणार. राजश्री नारबावास राजपुरीस पाठवणार. यमाजी शिवदेव व उमाजी चवाण ऐसे अंजनवेलीस पाठवणार. ऐशा तजवीजा होत आहेत. मुख्य गोष्ट कीं राजश्री स्वामी बोलले कीं राजश्री अंबाजीपंत राजपुरीस गेले आहेत. हे चार गोष्टी राजश्री प्रधानपंतास सांगेन कार्य होऊन येई ऐसें जालें तर उत्तम आहे. मूळ गोष्ट कीं राजश्री तात्याच्या कागदाची वाट पाहत आहेत. ऐसें वर्तमान येथील आहे. तुह्मास कळावें ह्मणून लिहिलें असे. राजश्री प्रतिनिधीकडील बहूमान बराच होत आहे. कार्यकर्ते तर तेच. विश्वासनिधी तर तेच. ऐसें घडोन आले. कळलें पाहिजे. खानदेशची बोली करून घेणें. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति. राजश्री प्रतिनिधीस बहुमान कडी व तोड़े व वस्त्रें पाठवूं लागले. तेव्हां राजश्री नारबांहीं व यमाजीपंतीं बहुतशी रदबदल केली कीं प्रधानपंतास बहुमान पाठविल्याखेरीज राव घेणार नाहींत. ऐसी रदबदल केली. तेव्हां यांनी रदबदल केली ह्मणून कड़ीं व तोडे व वस्त्रें बहुमान पाठविला. या उभयतांच्या आग्रहास्तव पाठविला. कळलें पाहिजे. हे विनंति.