[ ८५ ]
श्री. शके १६५५ ज्येष्ठ शुद्ध १४.
राजमान्य राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांसी आज्ञा केली ऐसी जे:--
तुह्मी विनंतिपत्र छ. ७ जिल्हेजीचें पाठविलें छ. ११ मिनहू प्रविष्ट जालें. लिहिलें वर्तमान कळों आलें. व सविस्तर चिरंजीव राजश्री फत्तेसिंग भोसले यांणी लिहिलें, त्याजवरून विदित जालें. किल्ले बिरवाडी व अवचितगड व सुरगड व घोसाळा व मदगड व बाणकोट हे सहा किल्ले फत्ते जाले. उत्तम गोष्टी जाली ! स्वामी संतोष पावले ! वरकड किल्ले यांची सूत्रें लागलीं आहेत, ह्मणून चिरंजीवांनी लिहिलें. तरी, तुह्मीं कार्यकर्ते, बुद्धिमंत; सेवक आहां. जेणेकडून कार्यसिद्धि होऊन ये तोच अर्थ संपदाल, हा स्वामींस निशा आहे. वरकड साहित्याचा अर्थ तरी तुह्मी व चिरंजीव ऐसे उभयतां महत्कार्याचा अंगेज करून गेले आहां. श्रमसाहस स्वामीचे राज्याभिवृद्धिनिमित्य करितां. ऐसे असोन, स्वामी साहित्य न करीत; हें काय घडो पहातें ! मुख्य स्थळाची कुमक या दिवसांत कोठूनहि होणें नाहीं. त्याहिमध्यें जेथें जे आहेत त्यांस आपलेंच जगावयाची फिकीर येऊन पडली आहे. तुह्मी साम-दाम-भेद-बुद्धि कर्तव्य तैसी करून महद्यश संपादणें. सेखजी आदिकरून मोकाशी जे भेटले असतील त्यांचे दिलासे यथायोग्य केलेच असतील. आणखी जे लोक यावयाचे असतील तेहि इलाज करून आणवणें. सर्वांचे मनोधारण करून कार्यसिद्ध करणें. वरचेवरी संतोषाचें वर्तमान लिहित जाणें. तेथें जे मराठे लोक भेटले असतीच त्यांचा बहुता प्रकारें दिलासा करून, जमानसाखळी करून घेऊन, तेच स्वामीकार्यावर सादर होत तो अर्थ करणें. बरकंदाज पाठवावयाविसीं लिहिलें. तरी लोक जमा करीत आहों. वरचेवरी जमा ज़ाले ह्मणजे रवाना केले जातील. राजश्री श्रीनिवास पंडित प्रतिनिधीकडील जमाव व राजश्री सचिवपंतांकडील जमाव तुह्मांसन्निध आहे. त्यांचा दिलदिलासा करून खर्चावेंचास देत जाणें. खर्चाविसीं अंतर न करणें. उभयतां एका मतें वर्तोन, स्वामिकार्य सिद्धीस पावून, आपले सेवेचा मजुरा करून घेणें. सविस्तर चिरंजीवास लिहिलें आहे त्याजवरून कळों येईल.+ सुज्ञ असा.