[ ८० ]
श्री. शके १६१४ जेष्ठ शु॥ ९.
पा छ. ९ जिल्हेज मघा नक्षत्री.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री महादेवासः-
प्रति अंबाजी त्रिंबक आशीर्वाद उपरि. आह्मी ता। छ० ८ जिल्हेज परियंत कुशल असों. विशेष. राजश्री आनंदराउ सोमवंशी सरलश्कर यांणी आह्मांस पत्र पाठविलें. तेंच पत्र तुह्मांकडे सोनारासमागमें पाठविलें, तें पावलेंच असेल. त्यास, तुह्मी सत्वर येणें. सरलश्कर यांणीं राजदर्शनाविशीं राजश्री स्वामींस पत्र पाठविलें होतें. त्यास, जेष्ठी पौर्णीमा जाहलियावर द्वितियेपावेतों मुहूर्त सरलश्करास नाहीं. बुधवारी मुहूर्त भेटीचा आहे. तरी तुह्मी पत्र पावतांच येणें. अनमान न करणें. बहुत काय लिहणें ! तुह्मी आपल्यासमागमें गणेश ब्राह्मण घेऊन येणें. आणि विठोबास घरीं ठेवणें. + हा आशिर्वाद.