[ ६८ ]
श्री.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री धोंडोबास :--
प्रति अंबाजी त्रिंबक आशीर्वाद उपरि. आह्मी ता। छ २९ जिल्हेज परियंत कुशल असों. विशेष. तुह्मीं राघोजी बाजी यासमागमें पत्रें पाठविलीं तीं प्रविष्ट जाली. खासगत हिशेब पाठविला तो पावला. गांवगन्ना का। सासवड येथील वसूल जाला, त्याचा हिशेब पावला. गल्ला गांवगन्नाचा हक्काचा वसूल काय जाला ? त्याचा हिशेब तपशिलवार लेहून पाठवावें. किरकोळ पैका तुह्मांस ज्याचा देणें होता, त्याचा पैका देविला. तें पत्र पूर्वी पदाजी माळी यासमागमें पाठविलें, त्याप्रमाणें तुह्मीं वारावार केली असेल. त्याचे उत्तर काय त्यांनी दिल्हें ? तें लिहिणें. पूर्वी तुह्मीं लिहिलें, दोन दुलया देऊन कार्यं केले; तरी बरें केलें. दोन पागोटी कोठून दिल्हीं ? तें लिहिणें. घरीहून दिल्हीं की विकत घेऊन दिल्हीं ? ते लिहिणें. गांवीचें लिहिणें. अववें लिहीत जाणे. बहिर माळी याची सनद एका बिघियाची कोणें हरविली ? ते वर्तमान खरें असेल तें लिहिणें. मग सनदेचा प्रयत्न करून. भेट विकत घेऊन देणें. किंमती लेहून पाठविणें. हा आशीर्वाद.