[ ६७ ]
श्री.
सहस्रायु चिरंजीव महादेवासः--
प्रति अंबाजी त्रिंबक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ. ३० साबान परियंत जाणून, तुह्मीं आपणांकडील वर्तमान लिहित जाणें. यानंतरी तुह्मी खेमाबरोबर व जंगलीबरोबर पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान कळों आलें. ऐसियासी, तुह्मीं कांहीं आतांच तांतड न करणें. चुन्याचें वर्तमान लिहिलें. तर, लोणारियापासून चुना घेऊन मोरयाच्या देवळाचें काम चालीस लावणें. व बेलदार याचा कौल पाठविला आहे तो घेणें. बेलदारापासून दरसदे रु॥ पांच हकदारी घेत जाणें. ह्मणिजे तो नथू तुमच्या गांवांतील बेलदारयाचे वाटे जाणार नाहीं. मोराजी बगाडा यासी सांगणें कीं, तुह्मांस सातारियास बोलाविलें आहे. तरी त्याजला लौकर पाठवून देणें. जर न ये तरी येथून मसाला करून. ऐसें पष्ट सांगून त्याजला पाठवून देणें. या उपरि सखावी नाईक याजला पाठवून देणें आमचा पैका जमा जाला त्याची जमेची बेरीज लिहून पाठविली; परंतु खर्चाचा हिशेब कळला नाहीं, तर खर्चाचा हिशेब लिहून पाठविणें. याउपरि वाड्याच्या भिंती तुह्मांस काय घालणें असेल तो पैका तुह्मी आपला वेंचून, जें करणें असेल तें करणें. आमचा पैका कांहीं वाड्याचे कामास न वेंचणें. लोणार्याचा कौल तुह्मी आपणांपाशीं ठेवणें. आणि त्या बेलदारास सांगणें कीं, नथू कांहीं तुमचे वाटेस जाणार नाहीं. सखावा नाईकास सांगणें कीं, तुमचा पोमाना बा। पैका उगवला आहे. त्याजसाठीं बोलाविलें आहे. यानंतरी लांकडें आणावयाचा मजकूर लिहिला. तरी आमचा पैका कांहीं खर्च न करणें.+ उगेंच राहणें. मग जैशी त्याचा विचार श्री शेवटास नेईल तें पाहून. कळलें पाहिजे. ही आशीर्वाद.