[ ५६ ]
श्री
शके १६५३.
चिरंजी(व) राजश्री धोंडोबा यांसिः-
बाजीराऊ बल्लाळ प्रधान आशीर्वाद उपरि. राजश्री आंबाजीपंततात्या यांणीं गहु कैली खंडी ४ चार व तांदूळ खंडी तीन ऐसे देविले आहेत. त्याप्रा। रातोरात आजीगांवकरियांचे पदरीं घालून गहु दळवून, व तांदूळ सडवून, सत्वर येऊं प्रविष्ट होय, ते गोष्टी केली पाहिजे. तूप व तेल जें तुह्मांपाशीं असेल तें पत्रदर्शनी पाठवून देणें. येविशीं अनमान कराल तरी तुह्मांस आमची आण से. जे क्षणीं पत्र पावेल ते क्षणी लिहिलेप्रमाणें सामान पाठवून देणें. गांवामधेंही तूप, तेल, वाणियाकडे, व गांवकरियांकडे, असेल तें मनास आणून सत्वर पाठविणें. ऐसी, राहुजी पाटिलासही लिहिलें असे. जाणिजे. + टाकोटाक जें अनकूल घरांत असेल तें पाठवणें. अनमान कराल तरी आमची आण असे. तांदूळ सडून, गहु दळून, उदईक दोन प्रहराअलिकडे वरचेवर जे होत जाईल अनकूल, तें पाठवीत जाणें. तैसेच पाटलास सांगणें. हा * आशीर्वाद.