[ ५२ ]
श्रीराम.
शके १६५२ वैशाख.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दादोबा स्वामी गोसावी यांसिः-
पोष्य नारोराम नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन केलें पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. लिहिला अभिप्राय कळों आला. ऐशास, तुमच्या पत्रापूर्वी राजश्री स्वामींस राजश्री पिलाजी जाधवराव यांची पत्रें आलीं जे, आपणांस राजपुरीहून पत्रें आली, त्यावरून स्वार होऊन जातों, येविशीं आज्ञा काय ? ह्मणोन. त्याचीं उत्तरें पाठविली जे, तुह्मी जमाव घेऊन जाणें. ह्मणून ती पत्रें पावलियावारि, ते स्वार होऊन जातील, तरी उत्तमच; नाहीं तरी, त्यांची रवानगी तिकडे करून दिल्ही पाहिजे. राजश्री चिमाजीपंत यांच्या शरीरी समाधान वाटल्यानंतर ते येतील. दरबारी कोणी माणूस तुह्मांकडील नाहीं. याकरितां तुह्मी स्वार होऊन येणें. येविशीं राजश्री स्वामीचीही पत्रें मागाहून पाठवून देऊं. बहुत काय लिहिणें ? + लोभ असो दीजे. हे विनंति.