[ ४८ ]
श्री.
शके १६५१.
उभयतां चिरंजिवांस आशीर्वाद. उपरि. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. वर्तमान विदित जालें. ऐसियासी, या काळाप्रमाणें जें होतें तें उत्तमच आहे. बिघडली बाजी फिरून नीट व्हावी, हें ईश्वराचे इच्छेवरी आहे. होणें तें समयीं होईल. तुह्मां दोघांचवघांवरी निकर्ष फारच केला, तो ध्यानांत आहे. या समयांत तुमचें नीट करून द्यावें तरी तुमच्या खावंदाचें व आमचें स्वरूप कितीकसें राहिलें आहे ? तें कळतच आहे ! अधिक उणी गोष्ट तेथें सांगायासी गेल्यानें रुचणार नाहीं. दौलतीची वगैरे काळजी तुह्मीं कशास करितां ? राहिली नाही हें आह्मांसहि कळतें; परंतु, या काळांत कोणेहि गोष्टीचा इलाज चालत नाही. तुमच्या आमच्या मनोदयानुरूप घडून येणार असेल तें समयीं येईल. चिरंजीवहि या समयास उचित तेंच करितात. एखादी गोष्ट लेंकूरपणामुळें चुकत असतील. त्यांस येथून लिहितां येत नाही. + आमची पत्रें तुह्मांस जातील तितकीं शपथपूर्वक फाडून टाकीत जाणें. नवलविशेष आढळलेलें वर्तमान वरचेवरी लिहित जाणें. बहुत काय लिहिणें ! हे आशीर्वाद.