[ २८ ]
श्री.
१६५० ज्येष्ठ शु० ८.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री राघो अनंत गोसावी यांसिः- सेवक चिमणाजी बल्लाळ नमस्कार. सुहसन तिसा अशरीन मया अलफ. तुह्मांकडे सातारियाच्या देणियाचा पैका नेमून मुदती केल्या होत्या. त्यास, तुह्मीं मुदतीअगोदरच सातारा रुपये पाठविलें, ह्मणून राजश्री दादोबांनी सांगितले. बहुत उत्तम गोष्ट केली. तुह्मांस दिवाणच्या देणियाची नकड ठाउकीच होती. ऐसियास, सदरहू ऐवज नेमिल्यापैकीं बाकी राहिली असेल तो ऐवज राजश्री दादोबांकडे पाठवून देणें. अखेर सालचें देणें आहे व सालमजकूरचा पैका राजश्री स्वामीचा द्यावा लागतो, तरी राहिला ऐवज झाडियानसी पाठवून देणें. जाणिजे. छ० ६ जिल्काद. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.