[ २५ ] श्री. शके १६४८ मार्गशीर्ष शु० ३.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री बाजीराऊ याप्रती, नारोराम कृतानेक विनंती येथील कुशल मार्गेश्वर सुध त्रितिया शनिवार जाणून स्वकीय लिहिलें पाहिजे. विशेष. तुह्मी निंबदेवारियाचे मुकामीहून पत्रें पाठविली ती प्रविष्ट होऊन साकल्यअर्थ कळला. तुमच्या यावयाची प्रतीक्षा करीत होतों तों तुमचें पत्र आलें. तुह्मीं यावयाचा विचार केला, आणि अविलंबे आलेत, उत्तम गोष्टी जाहाली ! कंठाजी बांडे याकडील विचार लिहिला. ऐशास, राजश्री सेनापतींनी त्यास कांहीं बोलाविलें नाहीं, अगर चाकरीसहि ठेवत नाहीं. आह्मी त्यास लिहावें, येविषीं सांगितलें; परंतु त्यांणीं कांहीं आपणांपासून अंतर केलें नाहीं. वरकड सविस्तर चिरंजीव राजश्री चिमाजिचे पत्रीं लिहिलें आहे त्यावरून कळेल. तुमचेंहि येणें लवकरीच होईल. भेटीनंतर साकल्य कळेल, तुह्मी कितक विचार लिहिला, तर तुमच्या विचारानिराळें काय आहे ? भेटीनंतर साकल्य वर्तमान कळेल. मग विचार होणें तो होईल. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.