[ २२ ]
श्री. १६४७ कार्तिक शुद्ध ३.
विनंती उपरी. स्वामींनीं फौज जमा करून पंढरपूरच्या रोखें येतात. फौजा जमा होतात. हे बातमी खबर आसफज्यास पावेलच. तेही विचारांत पडतील. स्वामींसीं बिघाडितात, ऐसें नाहीं. व आह्मींही होऊन नबाबासी विरुद्ध करूं, हें सहसा होणें नाहीं. हाकालपर्यंत आह्मी नबाबास पत्र लिहिलें नाहीं. स्वामी तिकडून लिहिणें तें लिहितात. आमच्या लिहिण्यास व आपल्या लिहिण्यास द्वैतता पडेल, याच अर्थास्तव लिहिलें नाही. प्रस्तुतं स्वामींनीं नवाबास पत्र ल्यावयाचा मजकूर लिहिला. त्याच आन्वयें नबाबास लेहून पाठवूं. सारांश, स्वामींनी कोणेविसी चिंता न करावी. आह्मी, संस्थानाचे गुंते उरकून मोकळे जाहालों. मोकळे रानांत राहातों. स्वामीचे पुण्यप्रतापेकरून जें होणें तें उत्तमच होईल. इकडे मनसुबियाचे नेट पडावें असा नूर मात्र जाहला आहे. मनसबबाज कोण कोणें तरेनें खातो तें दृष्टीस पडेल, तदनरूप स्वामीस लेहून पाठवूं . रा। छ. १ रबिलाखर. बहुत काय लिहिणे ? हे विनंती.