[ १९ ]
श्री. शके १६४६ ज्येष्ठ शु॥ ६.
राजश्री पिलाजी जाधव गोसावी यासीः-
॥ छ अखंडतलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सु॥ खमस अशरैन मया व अलफ. पत्र पाठविलें पावलें. हत्ती आतांच द्यावा ह्मणून लिहिलें, त्यास, द्यावयाचें कांहीं संकट नव्हतें. तो हत्ती त्यांनीच दिल्हा, तेव्हांच चिरंजिवाचे नांवे आह्मीं दिल्हा. त्यांत राजश्री कंठाजी कदम येतील आणि त्यास हत्ती नवाबापासूनच देऊन, ह्मणजे हत्तीही दिल्हासा होतो आणि लौकिकही होतो. आणि हें तुमचे व रा। अंबाजीपंताचे चित्तांत येत नसेल, व रघोजीस तोच पाहिजेसा असला, तरी मग उपाय काय ? जें तुझी उभयता बोललेस तें खरें न करावें तरी काय करावें ? येथें नबाबापासून हत्ती ते आलियावर द्यावासा बोली करून ठेविली आहे. यांत जें विचारें उत्तम दिसेल तें करणें. उद्यां अगर परवां आह्मीहि लष्करास येतो. तुह्मी लोकांस निरोप देतां ह्मणून ऐकलें. त्यास, तुमचे लोक गेलियावर लष्कर कैसें राहेल ? यांत लष्करास निरोप द्यावा ऐसें तुमचे उभयताचे चित्तास आलें असेल, तरी आह्मी आलियावर भलते गोष्टींची वाट काढून निरोप द्यावयाचा. त्यास, ते उठण्यांत विचारास येईल. लष्करचा गाहा न उठे, तें करणें. आह्मी आपले वाईट बुद्धीनें यास भेटलों, करूं नये तें केलें. आतां तुह्मी तरी सारे विचार चितांत आणून येवढें युध्य होई तें करावें. मग पुढें कांहीं तरी होऊं ! उपास अत्रास करूं नये. वेळेस बाहेर शरम राहे तें करावें. एक चुकलें तरी दुसरियानें सावरावें. यांत जें तुह्मांस योग्य तें कराल. सर्व लष्करचा ओढा तुह्मांसच ओढणें लागेल. जाणिजे. छ. ४ जिल्काद. लेखन सीमा.
० श्री ॅ
राजा शाहूनरपतिहर्षनिधान ।
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥