[ १६ ]
श्रीसांव.
शके १६४४.
राजमान्य राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांसि आज्ञा केली ऐसी जे :-
तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. कितेक निष्ठेचे अर्थ लिहिले. ऐशास, येविशीचे कितेक अर्थ बोलणें ते समक्ष बोलावे, ह्मणोन तूह्मांसच हुजूर येण्याची आज्ञा करून, वरचेवरि पत्रें सादर जालीं असतां, अद्यापि येण्याचा विचार दिसत नाही. यावरून काय ह्मणावे ? निष्ठेचे निदर्शन स्वामींस यावें, ह्मणोन तुह्मांस वारंवार लिहिलें; व भेटी सही येण्याची आज्ञा केली असतां, तुल्यांकडून आळस होऊन दिवस घालवितां. येगोष्टीचा विचार तुह्मांजवळच असावा. तुह्मीच उद्योग केल्या अगाध नाहीं. परंतु हैगैनें घडत नाही. दुसरे स्वामीसन्निध उभयपक्षीचे कल राखून चालण्यास एक चांगला योजावा ह्मणोन लिहिलें. त्याचाहि विचार तुह्मींच करावयाचा तोहि न घडला. याजमुळें कितेक राज्यभारसंबंधी कामें तटलीं. तुमचेही प्रत्ययास येऊन त्याची उत्तरे प्रत्युत्तरें तुह्मींच करतां त्याची विस्मृति. तेव्हां तुमचे लक्षांत हे गोष्ट नाहींसें वाटतें. हें कच्चे कप्पे वरचेवर लिहून तुह्मांस जागृत करण्याविशीं स्वामींस आळस नाहीं. व तुह्मी आज कराल, उद्यां कराल, ह्मणोन कालहरणही हुजुरून होत नव्हतें. प्रत्यय तुह्मांस नाहींसा नाहीं. असें असोन, नबाबाकडीलही बोलणी पडलीं याजकरितां सुचविली. तत्रापि तुह्मी कळकळ धरून राज्यभारसंरक्षणार्थ सावधता करावयाची हे सदैव पत्रीं किती लिहावें ? यास्तव एकवेळ तुह्मी येऊन समजोन घेऊन करावें. हें आळस असतां घडत नाहीं हेंच आश्चर्य करितों ! आसो ! कांहीं दिवस एकवेळ समक्ष जाल्या व्यतिरिक्त कोणतेंही कर्तव्य स्वामींस नाहीं. पुढें तुह्मांपासोन घडतच नाहीं असाच निश्चय जाल्या, स्वामींस विचार करणें प्राप्त येईल. तो दिवस अवघड वाटेल ! मग धांवाधांव करूं लागाल, ह्मणोन वारंवार सुचवितों. तुमचे वडिलांनी निष्ठा धरून चालल्या अकल्याण जालें न जालें हें तुह्मीच चित्तांत आणावें. जाणिजे. बहुत लिहिणें तरि सूज्ञ असा.