[ १३ ]
श्री शके १७४१ चैत्र
श्रीमदनंतानंदमंदिर, रमारमणचरणद्वंद्वनिर्द्वंद्व, भजनासादिताशेषपुरुषार्थ, सार्थकिज्ञातात्मीयवंशावतार, समस्तजेगीयमानसकलभूपालहृदयानंदकर, वाग्विलासोदधिसंभूत, यशोनिर्वातमहायोगप्रकाशमान सकलमार्तंडमणीमुकुटालंकारपन्न, श्रीमनमाहासाधूविवेकनिष्ठ वैरागयोगवरिष्ठ परात्पराभिराम, श्री रामदास स्वामी महाराज पूर्णावतारी यांची वंशपरंपरा श्रुत व्हावी येतद्विषई आज्ञा केल्यावरून साकल्य निवेदनार्थ विनंती लिहिली ऐसी जे; मोजे जांब वगैरे खेडीं पांच सात येथील वृती कुलकर्णाची होती. ते वृती सुर्याजीपंत रामदास स्वामीचे तीर्थरूप करीत असतां, आपणास बंधु नाहीं, पूर्व वय, यावनीराज्य, याजकरितां पुत्रसंतानार्थ अराधना श्री सूर्यनारायण याची करूं लागले. तेसमई वय वीस वर्षांचे होते. त्या दिवसापसून भावार्थेकडून पसतिस वर्षांपर्यंत पुढे अनुष्ठान केलें. अन्य दैवत पूजाच करणें नाहीं. असा नियम होत्सातां अंखडीत चालवा. त्यांची स्त्री राणुबाई तीही येकनिष्ठेनींच अराधना सेवन करीत असतां कोणे एके दिवशी प्रत्यक्ष श्री सूर्यनारायण ब्राह्मणवेषरूपें येऊन सूर्याजीपंतास आज्ञा करिते जाले की, श्रीरामनवमी नवरात्र उछवादि भोजनें ब्राह्मणांचीं यथानुक्रमें करून रामउपासना मार्ग चालवावा, येणेंकरून कल्याणावह श्रयस्कर आहे. त्याजवरून सूर्याजीपंती उत्तर केलें की, सूर्यापरितें दुसरें दैवत पुजा ग्रहण करावयाची नाहीं. येको देवो केशवो वा शिवोवा. नारायणाची उपासना करावयाची नाहीं. आपण कोण, तें कळवावें. त्यावरून श्रीनारायण सांगते जाले कीं जी उपासना करितां तोच मी. राम आणि सूर्य दोन नाहीं. येकच. राम सूर्यवंशीचा आहे. उपासना रामनवमी महोत्सवादि सांगितल्याप्रमाणें करणें. तुह्मांस दोन पुत्र होतील. येक माझा अंश व दुसरा हनुमंत अंश अवतारी होईल. याप्रमाणें सांगोन श्री सूर्यनारायण अदृश्य जाले. नंतर कांही दिवसांनी राणुबाई गरोदर होऊन प्रथम पुत्र झाले त्यासमई आनंद महोत्सवादी विशेष करून नामकरणादि संस्कार केले. सूर्याजीपंताचे पंचावन छपन वर्षाचें वय, गंगाधर स्वामीचे जन्मकालाचेसमईं होतें. नंतर पांच सहा वर्षांनी दुसरे पुत्र झाले. त्याचे जन्मकालीं फार आनंद करून नारायण ऐसें नांव ठेवून नामकरण करिते झाले, बारसे विगैरे संस्कार केले. गंगाधरपंताचा वृतबंध करून लग्नही केलें. रामउपासना मार्ग करून उछव करूं लागले. नारायणबोवाचा वृतबंध केल्यानंतर कांहीं दिवसां सूर्याजीपंत समाप्त झाले. गंगाधरबोवा कुलकर्ण करून अराधनामार्गे चालत असतां एके दिवशी रात्रौसमयाच्याठाई यसकर महार याचे वेशें श्री मारुती येऊन गंगाधरपंतास बोलाविलें कीं मायबाप हकमि येऊन देवळांत बसला. पाटलास बोलाविलें ते येतात. तुह्मीं चला. हे ऐकोन चित्तास भय शंका प्राप्त होऊन उठोन देवळाजवळ आले. तो येसकर महार दिसेना हें पाहून घाबरेपणा शरीरीं आला. तो दोन पठाण देवळानजिक बसले ते पाहिले. पठाण उठोन देवळांत गेले. गंगाधरपंतास बोलाविलें. पंत देवळांत गेले. तों पठाण गुप्त झाले. श्री राजाराम दाशरथी व सीता व लक्ष्मण व मारुती प्रत्यक्ष येऊन दर्शन देउन गंगाधरपंतास सावध करून रामनवमी उपासनामार्ग सांगोन चार मुहुर्ती राम, सीता, लक्ष्मण, मारुती दिल्या. आणि ज्ञानमार्गे उपदेश दिल्हा. रामीरामदास नाव ठेविलें. नारायणास उपदेश देऊं ह्मणून बोलोन तात्काल अदृश्य झाले. रामीरामदास स्वामी घरास आले. त्या दिवसापासून आजपर्यंत पूजाउछवादी चाल जी चालत आली ती चाल चालत आहे. नारायणबोवा कांहीं दिवसा थोर झाले. लग्न करावें अशी विवंचना करून बोलत असतां बहुत अनर्थ करावे, रडावें, दडावें, इत्यादि करीत, तेव्हां येके दिवशीं मातुश्री राणूबाईनीं नारायण बोवास येकांती नेऊन सांगितलें कीं लग्न करितो ह्मणतों. तुह्मीं अनर्थ करितां. तेव्हां तुह्मांस पाहणार जे येतात ते वेडे मुल ह्मणतात, याजकरितां शहाणपण धरावें, आंत्रपाठ धरीतोंपर्यंत रडूं नये, संतोषरूप असावें, ह्मणोन सांगितले. न मातुः पर दैवतं, हें वचन शास्त्रवत जाणून मान्य जाले आज्ञेप्रमाणें वर्तो लागले. त्यासमई श्रीरामनवमी उछव दिवस समीप आले, उपासना मार्ग आपणास सांगावा ह्मणून गंगाधर स्वामीस विचारूं लागले. त्याणीं उत्तर केलें, तुह्मांस उपासना मार्ग सांगणार वेगळे आहेत, आह्मीं काय सांगावें ? तें ऐकोन बहुत खिन्न झाले. रुसून गावाबाहेर श्री मारुतीचें देऊळ आहे, तेथें जाऊन निजले. गांवांत जेवणाकरितां, जाण्याची स्थलें होतीं तेथें शोध केला परंतु ठिकाण लागलें नाहीं. फराळ करून घरी निजली. नारायणबुवा देवळांत निजले. मध्यरात्र झाल्यावर श्री मारुती येऊन नारायणबुवास सावध केलें. कां निजला ह्मणून विचारलें. त्यांणीं सकळ वृत्तांत सांगितला. परंतु उत्तम मारुतीनें बोलोन रामचंद्राचें दर्शन करवितों ह्मणोन सांगोन गुप्त झाले. कांहीं वेळ गेल्यावर श्री राम व सीता व लक्ष्मण व मारुती ऐसे उभे राहिले. श्रीचें तेज पाहून नेत्रांस झापड पडती झाली. हें मारुतीनें पाहून नेत्रांस उदग लावून सावध केलें. रामउपासनादि सर्व मार्ग सांगोन उपदेश देऊन, मस्तकी हस्त ठेऊन, रामदास ऐसें नाव ठेविलें, वलकल दिल्हें. तसे वस्त्र मिळत नाही, याजकारितां हुरमुजी भगवें त्या रंगाचे करावें, अशी चाल आहे. ती चाल अद्याप चालत आहे. त्यानंतर लग्नाचा निश्चय करून लग्नपरिवार घेऊन समारंभेकडून गावास गेले, तेथें वधु पूजा वगैरे यांजकडून झालें, तिकडून वराड वर जातांच श्रीमंतपूजन, हरिद्रारोपण, तेलवण, रुखवत, विगैरे इकडील तिकडील परस्परे मुहुर्त होऊन लग्नास वरास घेऊन जाण्यास समारंभे आलें, घेऊन जाऊन मधुपर्कादि याज्ञिक झालें. मंगलाष्टकें ह्मणोन प्रथम सावधान ह्मणताच सावध झालें ह्मणोन निघोन खटाव सेंदरे येथें देवालय होतें त्या स्थळीं गुंफा होती तेथें बसोन अनुष्ठान बारा वर्षेपर्यंत केलें, बारा वर्षे पुढे तीर्थाटन करून ज्या स्थळीं मनुष्यांचा संचार नाहीं, तेथें जावें, बसावें, असे प्रकारें रामदास स्वामी करीत असतां श्री मारुतीने सांगितले जे, तुह्मांस जड देही मनुष्यें हीं अज्ञान, यांस ज्ञानमार्ग लावून वृत्तीवर आणावें याजकरितां श्री रामचंद्राचे उपदेश दिल्हा, असे असोन तुह्मी वनोपवनें हिंडणें चांगलें नाही. ज्ञानमार्ग सांगोन जनास रूढींत आणावें. याजमुळें कृष्णातीरी येणें झालें, ह्मणून दासबोधांत स्वामीचें वाक्य आहे. शिवाजी महाराजास उपदेश होऊन चाफळीं राहणें जालें. परळीस येऊन राहावें. शिवाजी महाराजाकरितां यवनी राज्य परम दुरधर अनीती तें पादाक्रांत करून घेणें. रामदास स्वामीचे आशीर्वादेंकरून फलद्रुप झालें. येविषईची कथा सांगेन, लीहीन, आणि आपणास निवेदन करीन, तरी ग्रंथवत् विस्तार फार वाढेल. याजकरितां कळावें, ध्यानांत यावें, यास्तव सुचनार्थ लिहिलें, वरकड त्यांचे सविस्तर उणार्णव लिहिण्याची शक्ती कोठील ? किती लिहावी ? ऐसे स्वामी अवतारी; त्यांची परंपरा वंशावळें श्रवण करून पुढें स्वामीचें चरित्र श्रवण मनन करावें, ह्मणोन विनंती केल्यावरून बहुत संतोषी होऊन परंपरा आजपर्यंत विस्तार सांगावा, आज्ञा झाल्यावरी रामदास स्वामी ब्रह्मचारी रुद्रावतारी त्यांची संतती नाहीं. त्याचे ज्येष्ठ बंधु गंगाधरबोवा ते रामीरामदास. त्याचे लग्न सूर्याजीपंतानीं केलेंच होतें, त्याचे पोटीं संतती बी तपशीलः--
प्रथम सूर्याजीपंत त्याची स्त्री राणूबाई त्याचे पोटीं