[१०] श्री. शके १६३४ श्रावण शुद्ध ३
चिरंजीव राजमान्य राजश्री शाहूराजे यासीः–संभाजीराजे आशीर्वाद उपरि येथील वर्तमान श्रावण शुद्ध तृतीया पर्यंत कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. तुह्मी पत्रें पाठविलीं तीं प्रविष्ट जाहालीं. दिलेंद्राचा पुत्र अलीगोहर यागी होवून आषाढ वद्य द्वादशीस आपणासमीप आला. पाचचार सहस्र फौज समागमें आहे. वजीर वगैरे मातबर सरदार यांची राजकारणेंहि घेऊन आला आहे. जातीनें मर्द, मनसुब्याचे तोडिजोडीस परम दक्ष, तसेंच, औदार्यादिक सर्व गुणेंकरून संपन्न, यवनाधिपत्यास योग्य, असा आहे. परंतु इकडून साध्य झाल्याविना परिणाम नाहीं जाणोन येऊन भेटला. याउपरि येविसीं जसी आज्ञा तसी वर्तणुक करण्यांत येईल; ह्मणोन विस्तारें लिहिलें तें कळलें. ऐशास, दिलेंद्रास अत्युन्माद होऊन, दक्षणेस येऊन फार अमर्यादाचरण केलें. त्यास कालेंकरून शिक्षा करणें हें ईश्वरासच अगत्य; तदनुसारच होण्याचे परयाय अलीगोहर याचे येण्यांत दिसोन आले. याचें येणें स्वामीच्या महदानंदास कारण जालें. याउपरि अलीगोहर यास, भीष्मपराभवार्थ शिखंडीचा ठाई आदर, त्याप्रो। यास हितावह. परंतु सर्वप्रकारें स्वामीच्या धर्मराज्याची अभिवृद्धि होय, अशी युक्ति योजोन रामचंद्र पंडित अमात्य यासमागमें विस्तारें सांगोन रवाना केलें. *