[ ३ ] श्री शके १६१६ आश्विन वद्य १३
श्रीमत् क्षत्रियकुलावतंस महाराज राजश्री छत्रपति स्वामीचे सेवेसीः-- सेवक निळकंठ बल्लाळ कृतानेक, विज्ञापना. स्वामीचे कृपादृष्टीकरून ता। छ २६ सफर पावेतों सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विनंतिः स्वामीनें आठशे रुपयांकरितां माणकोजी हुकेवारदार पाठविला. त्यासी येथें ठेवून घेऊन पैकियाची जितकी तरतूद मात्र करावयाची तितकी केली. परंतु, कांहीं साध्य झालें नाही. श्रम केले तितकेहि निर्फळ झाले. मुलकामुळें टकापैका यावा, तरी वरघांटचा अंमलच चालिला नाही. कोंकणचे चौथाईचे दहा हजार रुपये ऐवज होतो तो पहिलेच वसूल होऊन गेला. पुढें सरदारीस व गडकिल्याचे बेगमीस ऐवज नाही. त्यांतहि आह्मी या प्रांते येतांच श्रम करून जो ऐवज साहस करून मिळाला तो सेवेसी पाविला. सांप्रत कोंकणांत फिसाहस जालियामुळें कोंकणांतील प्रसंग विस्कळिल जाला. स्वारीसिकारी करावी, तरी तोहि प्रसंग नाहीं. मुलूख वैरान. हे रीतीचें वर्तमान आहे. तें पूर्वीहि सविस्तरेंकरून सेवेसी लिहिलेंच आहे. माणकोजीस बहुत दिवस जाले, राहवितां मये, याकरितां यत्नप्रेत्न करून बरोबरी माणकोजी हुकेबारदार ऐवज पाठविला असे. बितपशील रुपये.
२०५ ऐन रुपये
१०४ मोहरा ८ दर १३
९१ सोने वजन तोळे ।१ दर १३ प्रमण
------------
४००.
एकूण चारशे रुपये पाठविले असेती. त्याची सनद सादर करावया आज्ञा केली पाहिजे. सेवेसी श्रुत होय. हें विज्ञापना.