फाल्गुन शुद्ध १५ पूर्णिमा शनवारी हुताशनी जाली असे. रविवारचा ठराव होता हुताशनीचा.
धर्मोजी वाळके यांशी व रामजी वाळके याशीं दिघीच्या पाटिलकीचा काजिया होता. सालगुदस्ता बापूजीपंती नियम केला. रामजी लटका जाला होता तो राजश्री पंताकडे जाऊन होळी अमानत करून आला होता. त्यास राजश्री बापुजीपंत अवरंगाबादेपावेतो पेशविया बरोबर गेले होते. त्याणीं विनंति करून आपल्या नांवें पेशवियाचे पत्र घेतलें कीं, तुह्मीं इनसाफ केला आहे तो बराच केला आहे. धर्मोजीची पोळी अमानत केली होती ती मोकळी केली. त्याची त्याजकडून लावणें. निवड पत्राप्रा। सुरळीत चालवणें. ऐसें घेऊन आले. रथोजी वाळकियास बोलावून आणून आणीख साडेसातशें रु॥ नजर घेऊन पागोटें बांधोन पोळी लावावयाची आज्ञा दिल्ही. रामजीची बायको आणिली. रामजी हजीर नव्हता तिजला दोनशें रु॥ गुन्हेगारी खंडली आहे. तिचा तगादा लावून निशा करून घेतली असे. १
खडकीच्या कुलकर्णाचा टुल्लू व कानडे यांचा काजिया होता तो गुदस्ता बापूजीपंती विल्हें लाविला. कानडे खरे जाले. परंतु टुल्लू मागती पेशवियापाशीं जाऊन राजकारण करून कुलकर्ण अमानत केलें. गुमास्ता दिवाणांतून पाठविला. त्याचीही बापूजीपंतीं वाळकियाच्या कामाबरोबर रदबदली करून कानडियाच्या हातें कुलकर्ण घेणें ह्मणून गांवास पत्र आणिलें, गुमास्तियास उठोन येणें ह्मणून, ऐशी दोन्ही पत्रें आणिलीं. कानडियास कुलकर्ण चालवावयास आज्ञा केली असे. १
फाल्गुन वद्य १ रविवारी पेशवियाकडील बातमीचे कागद आले. नासरजंगानें सल्ला केला. जाहगीर यास दिल्ही. हांडे व खरगोणप्रांत.