वद्य ५ सोमवारीं श्रीमंत भाऊ मुहूर्तेकरून पाहटे सा सात घटका अगर तीन चार घटका रात्र असेल तेव्हां लश्करांत मुंढवियास गेले. तेच दिवशीं संध्याकाळचा च्यार घटका दिवस उरला तेव्हां शिदोजी नरसिंगराऊ लश्करास गेले. बहिरजी शितोळा बा। होता. ढलाईतही होते.
वद्य ७ बुधवारी मल्हारपंत आबा मजुमदाराकडील सुभानजी बावकरच्या घरावर येऊन बाईस व लक्ष्मणबावास बोलावून नेले. मोकाशाही आणले होते. वर्तमान मनास आणिलें. जागा मोजिली. गेले.
वद्य ८ गुरुवारी नारो आप्पाजी मुहुर्तेकरून श्रीमंताकडे लश्करास जात होते. त्याचा चुलतचुलता पाडळीस वारला. सुतक पडिलें ह्मणून राहिले. कोनेर त्र्यंबक याच मुहूर्ते गेले.
वद्य ८ शुक्रवारी लाडूबाई जानबा भुलबास लक्ष्मणबावास घेऊन, मुंढवियाच्या मुक्कामास जाऊन, शिदोजी नरसिंगराऊ याचा निरोप घेऊन, रात्रीं घरास आली. दहा हजार करार केले. वसूल मुजरा घ्यावा. बाकीची वाट करावी. जगोबाचा पाववायाचा करार मदार गुदस्ता केला आहे. त्याप्रा। चालवावें, ऐशी आज्ञा केली. कावडीचा कागद कानेरेपंतीं घेतला आहे तो माघारा द्यावा ऐसें केलें. कावडी सोडावी त्याणीं, ऐसें जालें असे.
वद्य ९ मंदवारीं श्रीमंत सासवडास गेले. तेथून जेजुरी, मोरगांव, कुरकुंब करून येणार.
वद्य १० रविवारीं श्रीमंताचें लश्कर व डेरे कूच करून पुणियावरी गेले. बा। जिवाजीपंत आण्णा आहेत.
अश्विन १ वद्य ९ सोमवारी पहाटेस बापूजी श्रीपत यांस देवआज्ञा जाली. त्याची धाकटी स्त्री गौबाईनें बराबर सहगमन केलें असे.
कार्तिक शुद्ध ५ शुक्रवारी पहाटेस आप्पाजी मल्हार धडफळे याची मातुश्री भिऊबाई यांस देवआज्ञा जाली व तेच दिवशीं तीन घटका दिवस आला होता तेव्हां सौ। वेणूबाई, रा। मोरोपंत आपाची वडील कन्या, ईसही देवाआज्ञा जाली. येथें मोरोपंताच्याच घरीं म्रुत्य पावली असे. १
कार्तिक शुद्ध १२ शुक्रवारी दोन अडीच प्रहरें रात्रीं पुरंधरींहून राजश्री श्रीपतराऊ बापूजी व रा। शामराऊ बाबा निघोन येथें पुणियास कार्तिक शुद्ध १३ शनवारीं प्रातःकाळीं दोन घटका दिवस आला तों आले. त्यांच्या वाडियांत श्रीमंत राजश्री सदाशिवपंतभाऊ येऊन त्यांस घेऊन आपल्या वाडियांत गेले. पूर्ववतप्रों। त्यांचा त्यांजकडे सुभियाचा धंदा करार होऊन वस्त्रें एक तिवट व एक पासोडी पैठणी दिल्ही असे. १
पौष शुद्ध १३ मंगळवारी सायंकाळच्या दोन घटका दिवसा मोरो विश्वनाथ धडफळे यास देवआज्ञा जाली असे पुण्यामधे. १
राजश्री बाळाजी बाजीराऊ व बापूजीपंत शिरवळचे मुक्कामीहून राजश्रीचा निरोप घेऊन फाल्गुन शुद्ध नवमी रविवारी पुणियास आले.
फाल्गुन शुद्ध १४ शुक्रवारी बापूजीपंत पुरंधरास माचीस आपल्या घरास गेले. उमाबाई दाभाडी शिरवळीहून निरोप घेऊन पुणियास आली. नानांनी मेजवानी केली. पूर्णमेस तळेगांवास गेली. सेनापति राजश्रीकडे शिरवळीहून गेले. संतबा व गोविंदराऊ देशमूख नारो अनंत धडफळे हेहि शिरवळीहून पुढें राजश्री बरोबर गेले आहेत. सदरहूजण पूर्णमेस गांबास आले असेत.