वद्य १० गुरुवारीं श्री ज्ञानेश्वराच्या देवळांत अवशीचे सा घटका रात्रीं वीज शिरली. धुपारती करून एक गुरव व एक ब्राह्मण व एक विधवा बायको ऐशीं समाधीपाशी गेली होती तेव्हां वीज शिरली. यामुळें बायकोचे मांडीस धक्का लागला, परंतु वांचली आहे. गुरवाच्या उरावर धबका बसला. त्याच्या गळ्याची कंठी तुटली. परंतु तो बोलत चालत होता. वांचेसा होता. ब्राह्मणास पुरती जरब बसली. तो पडला. मंडपांत आणिला तों वारला. देवळांतील विठोबारखमाईवरील वस्त्रें हरपाळलीं. आणि वीज देवळांतून वरती गेली देवळास चीर पडली. बाहेर शिखरापाशीं ज्या वाटेनें निघाली तेथें एक वीटच उडोन गेली. तीच वीज चोपाळियावर पडली. चोपाळा भंगला. चिरा पडिला. ये जातीचें वर्तमान जालें असे. कोण्ही सांगितली कीं दारावाटेनेंच वीज माघारी गेली. मग शिखरास लागोन चोपाळियावर पडली.
वद्य ११ शुक्रवार तारा थोर एक पडिला. लोकांनीं देखिला.
वद्य ११ सह १२ मंदवारी दोप्रहरा दिवसा अनमानें सौ। ठमाबाईस पुत्र जाला. पुणियांत त्यांचे घरीं प्रसूत जाली. खंडेराऊ जाधव वगैरे याणी दोन सूर्य पुणियांत सकाळचे देखिले.
वद्य १३ सोमवारीं चौदावे रोज बळवंतराऊ याजकडील पत्रें श्रीमंतास आलीं कीं, कडपाचा पठाण बाहेर आला होता त्याशीं जुंझ जालें. मोडून मारून टाकला. कडपें घेतलें. फत्ते जाली. ऐशी पत्रें आलीं.
आश्विन मास, शके १६७९, सन ११६७.
आश्विन शुद्ध १० मंदवार विजयादशमी पेशवे उजेडासारखे शिलंगणास गेले होते. येतेसमयीं वायबार सुटले. तेव्हां हत्तीवरल्या निशाणदारास पायास गोळी लागली व आणीखही एकादोघांस गोळ्या लागल्या. गोपाळराऊ गेविंद यास चौघडेनौबत दिल्ही व मल्हारराव रास्ते यासही चौघडे दिल्हे.
शुद्ध १२ सह १३ सोमवारी रात्रीं पेशवियाचे डेरे बाहेर जाले. पाहटेची साघटका रात्र उरली ते समयीं श्रीमंत स्वार होऊन डेरियास गेले. पालखीत बसोन गेले.
वद्य ३ मंदवारी शिदोजी नसिंगराऊ देशमुख याची कलावंतीण श्रीमंतांनीं ढलाईत देऊन गंगेपलीकडे लावून दिल्ही.
वद्य ४ रविवार. थोरले श्रीमंत थेवरास गेले. भाऊ घरीं राहिले.