श्री.
सेवेसी विनंति. येथून कागद घेऊन गेला त्या कार्याचा मनसबा काय करावा तो लेहून पाठवणें. अबल कागद ज्याची नकल येथें आणिली होती तो आपले दृष्टीनें पाहून ठेवणें. सदाशिव केशव राघोपंताकडील त्याजला घोडियाचें सांगितलें आहे तो घरास आला तर ठीक करून ठेवणें हे विनंति.
आषाढ मास शके १६७९.
आषाढ शुद्ध १० सोमवारीं अडचा प्रहरा जगन्नाथपंत आबाची लेक तुकी वारली. तिचें दहन करून मल्हारी घरास आला. आणि संध्याकाळचा सा घटका दिवस राहिला ते समयीं सावडावयासी गेला तों रामाजी नाईक भिडेहि वारले. त्याचेंहि दहन जालें ह्मणोन सांगितलें. वेथा पहिलीच जाली होती. तेच वेथेनें वारले.
शुद्ध १२ बुधवारीं तिसर्या प्रहरा राजश्री शामराऊबाबा बाई देशांत श्रीमंतांनीं पा। होते ते पुणियास आले. श्रीमंताची भेट घेतली. सौ। जिजाबाईस श्रीमंतानी मेजवानी बहुत आदरें केली. वस्त्रें भूषणें हत्ती घोडे रुप्याची अंबारी वगैरे दिल्ही.
शुद्ध १४ शुक्रवारी सोभाग्यादिसंपन्न जिजाबाई संभाजी राजियाची राणी पुणियासी आली होती ते रोजमजकुरीं गेली. त्याजला घालवीत राजश्री सदाशिवपंतभाऊ गेले होते.
शुद्ध रुजू. वद्य १ शनिवारी बखाजी नाईक जाचला यासी देवआज्ञा जाली. साजापेजा असतां एकाएकींच वारला.
वद्य ४ मंगळवारी अंबाडचा देशमूख सैद ह्मणून मुसलमान होत, लचांडखोर होता. तगलुफी शिक्के देखील करीत होता. त्याची गर्दन मारली. माणकोजी बाणराऊ सुतार ह्मणून लचांडखोर होता त्याजला मार ( पुढें गहाळ. )
अधिक आश्विन, शके १६७९.
वद्य ३ सह ४ शुक्रवार. श्रीमंत थेवरास चिंतामणीच्या दर्शनास गेले.