श्रावण मास.
शुद्ध ४ मंगळवार श्रीमंत राजश्री भाऊ व पुरंधरे घोडियाचे रथांत बैसोन धांवतच जाऊन थेऊरच्या देवाचें दर्शन घेऊन ताबडतोब बराबर आले.
शुद्ध ६ गुरुवारी दोप्रहरापासून श्रीमंतानी दक्षणा द्यावयासी प्रारंभ केला.
शुद्ध ८ मंदवारी संध्याकाळीं ब्राह्मण देकार घ्यावयाकरितां रमणियांत कोंडले होते. ते देकार देऊन संध्याकाळीं सोडलें. दोन चार ब्राह्मण जाया जाले. वारले. दक्षणा यंदा गु॥पेक्षां नेमस्त दिल्ही. ब्राह्मण पासष्ठहजारपर्यंत अवघे जाले असतील. आठ लक्ष रुपये लागले असतील.
शुद्ध १० सोमवारीं मल्हारपंत पुरंधरे पुणेकर वारले. बायको सती निघाली. पोटीं पुत्र नाहीं. महादेबाबानीं तीन रोज सुतक धरलें. ते पांच धरीत होते. ह्मणून ते पिंपळेकराच्या घरांतील ह्मणवितात. पिंपळेकर नव्हे ह्मणतात.
शुद्ध १४ सह पूर्णिमा शुक्रवारीं रामाजीपंत एकबोटे याची श्रावणी जाली.
वद्य ३ सोमवार श्रीमंत राजश्री पंतप्रधान थेऊरास गेले.
वद्य ४ मंगळवार श्रीमंत भाऊ मागोन गेले. व चतोर्थीउद्यापन श्रीमंतांनी केलें.
वद्य ५ बुधवारीं भाऊ सडे येऊन, येथें भोजन करून, मागतीं माघारें थेवरास गेले.
वद्य ६. गुरुवारीं श्रीमंत थेवरास गेले होते, ते भोजन करून थेवरींहून पुणियास आले.
वद्य १२ बुधवारी राजश्री शिदोजी नरसिंगराऊ देशमुख यांची स्त्री अकळुजेहून आली. त्याजबरोबर अमृतराऊ नाइक निंबाळकर याणीं हत्ती व घोडी ऐशीं आपण ह्मणोन पाठविलीं.