शुद्ध ५ मंगळवार. खंड माळी लडकज याजला शिवा माळी याणें फसलियाचें येजितखत लेहून दिल्हें. त्याजवर पांढरीची साक्ष घातली असे. १
शुद्ध ६ बुधवार वितिपात. श्रीमंत राजश्री बाळाजी बाजीराऊ प्रधान याणीं पर्वतीस सुवर्णतुळा केली. सात हजार मोहरा वजन जालें. याशिवाय आणीख सहा लोह सुवर्णाची झाली. याजवर लोखंडाची, त्याजवर काशाची, त्याजवर शिशाची, त्याजवर नारळाची, त्याजवर चंदनाची, त्याजवर भाताची येणेंप्रो। सात केल्या. तळवटीं घरें बांधली आहेत. तेथें केल्या असेत.
शुद्ध ७ गुरुवार. दिल्लीहून राजेश्री राघोपंतदादाचे कागद श्रीमंतास आले की, अहमदशाहा कैद करून, अलमगीर पातशाहा नवे बसविले. ह्मणून खुश खबर आली. ह्मणोन श्रीमंतानी खुशालीच्या तोफा केल्या, व लोकांनीं नजरा केल्या श्रीमंतास.
शुद्ध ११ रविवार. श्रीमंतानी लालपळता सुवर्णाच्या करून दान केले. पर्वतीस केले असे.
आषाढ वद्य.
वद्य ४ रविवार श्रीमंत राजश्री पंतप्रधान श्री थेऊर चिंतामणीच्या दर्शनास गेले.
कोंडोपंत एकबोटे यांणीं नीळा तट्टू लक्षुमणास बसावयासीं दिल्हा होता. त्यास पाऊस लागला याजकरितां कोंडोपंताचे पागेंत बांधावयासी रामाजीपंतीं माणसाबरोबर पाठवून पागेंत बांधला. मग दोप्रहरां कोंडोपंतीं तट्टू माणसाबरोबर पाठवून दिल्हा. त्यावर रामाजीपंत तट्टू घेऊन गेले. कोंडोपंताचे दरवाजियापाशीं होते. मग कारकून बोलावूं आला कीं, तुह्मास कोंडोपंतीं बोलाविलें. मग रामाजीपंत त्याजपाशीं गेले. कोंडोपंत बोलले कीं, आह्मीं तट्टू ब्राह्मणास दिल्हा आहे. माघारा घेत नाहीं. तेव्हां रामाजीपंत ह्मणाला कीं, ब्राह्मणास दिल्हा ह्मणतां तेव्हां आह्मांस लागत नाही. तेव्हां सोडून दिल्हा. उभयतांहि आटपलें नाहीं. कोंडोपंत बोलले कीं, आमच्या तट्टावर एका हजाराची असामी मिळविली व श्रीमंताशीं बळख केली आहे, जी मिळविलें तें द्या. तेव्हां रामाजीपंती ह्मटलें कीं, तुह्मी आमच्या बापाच्या घोडियावर बसला व बेरगियाची मुजमूहि त्यांनी लाविली, त्यामुळें तुमचें रूप जालें, तुह्मी जें मिळविलें आहे तें देणें, मम आह्मीं देऊं. त्यावर बोलले कीं, तुह्मांस वाडियासीं संबंध काय आहे ? ऐशी बोलीचाली झाली. तट्टू मोकळा सोडिलो. पागेंत बांधों दिल्ही नाहीं.
वद्य ८ गुरुवारीं राजश्री आप्पाजी जाधवराऊ याणीं जेष्ठ मासीं तिसरें लग्न केलें. त्या बायकोस न्हाण आलें. तिचें वोटभरण रोजमजकुरीं केलें. याजकरितां मातुश्री लाडूबाई व बहिरोबा वाघोलीस गेले. रोजमजकुरींच रामाजी शिवदेव याजला श्रीमंतानीं वाडा दिल्हा. तेथें मलकाप्पा कानडा राहत होता तो घर टाकून गेला होता. त्या घराचें कुटुंब सरकारचा कारकून व प्यादे येऊन काहाडून घरांत किरकोळ लांकडे व रिकामे बुधले, वगैरे अबदागिराची दांडी, व माचवे, व पलंगाचे वह्या ऐसें होतें. ते सरकारांत राजश्री जिवाजीपंत आण्णा यानीं नेलें. आणि घर रामाजीपंताचे हवाला केलें.
वद्य ११ रविवार बापोजी बिन तिमाजी पा। मोकदम, मौजे कोलवडी, यास रोजमजकुरी कोलवडीस देवआज्ञा जाली.
वद्य १४ गुरुवार. राजश्री रामचंद्रबावा लश्कराहून देऊसेस गेले. तेथून पंढरीस यात्रेस गेले. तेथें गोपाळराऊ, जिवाजीपंताचे पुतणे, यासीं चाकरानफरी कटकट जाली. त्यास, गोपाळराऊ याणीं बावाचे माणसास व त्यास शिव्यागाळी दिल्ही. त्यामुळें बावास राग येऊन गोपाळरायासी माणसें लावून पंढरीस मारलें, ह्मणोन वर्तमान आलें. त्यास आजी रामचंद्रबावा पुणियासी आपल्या घरास आले. रोजमजकुरी रात्रौ घटका सुमार १७ मधें श्रीमंत राजश्री सदाशिवपंतभाऊ नाशीक त्र्यंबकास गेले होते ते घरास दाखल जाले. तेच दिवशीं बापोजी पा। कोलवडकर याचा लेक पिराजी एकच होता तो वारला.