आषाढ मास.
शुद्ध २ मंदवारीं शिदोजीबावा शितोळे यास एकाएकीं वाखा होऊन वरचेवर वारले. सटवोजी परमळराऊ याचे घरीं बिर्हाड होतें. तेथें रोजमजकुरींच खबर आली की, अहमदशाहा पातशाहा पळून गेला. त्याचें लश्कर आवघें राजश्री रघुनाथपंतदादांनी लुटलें अशी खबर आली. मणचरचे मनसुबीचा सिद्धांत केला. निम्में वडीलपण सरकारचे देहूडीस घेतलें होतें त्याप्रों। करार . बाकी निम्मे राहिली त्यामध्यें निम्मे गंगाजी व संताजी होडा याजकडे व बाकी निम्मे येसाजी व सयाजी थोरात घावटे याजकडे. नांगर सरकारचा सरकारच्या नांवें खालें ल्याहावा. होळीची पोळी सरकारची, त्यामागें होडियाची. थोरातास समंध नाही. याप्रा। सिद्धांत जाला. कागद होणें असे. १
आषाढ मास.
शुद्ध ३ रविवारी राजश्री रघुनाथ बाजीराऊ याणीं अहमदशाहा पातशाहा दिल्लीहून बारा कोसांवर आले होते ते लुटले. आणि कबिलासुद्धां धरिले. ह्मणून वर्तमान आलें. राजश्री सदाशिवपंत भाऊ श्री त्रिंबकास सिंहस्थाचे स्नानास गेले रोजमजकूरी.
शुद्ध ४ सोमवारी खंड माळी बिन्न ठक माळी व बाळा माळी बिन्न ++ व रघतमाळी बिन्न +++ लडकज यांचे व शिवा माळी व लखबा माळी बिन्न दगडू माळी लडकजियांचे भांडण थळें फसलाकास रुके + बारा याचें भांडण होतें. शिवा माळी व लखमा माळी व खंड माळी वगैरे यांस ह्मणत कीं, मिरास पुरातन आहे, निम्मे तुमची व निम्मे आमची. खंड माळी वगैरे ह्मणत कीं, मुळची मिरास नव्हे, सोमवार पेठेच्या मुबदला आह्मास व वडिलास दिलें आहे. त्याची मनसुबी साल गु॥ बापूजी आनंदराऊ कमाविसदार क॥ पुणें याजपाशीं पडली होती. तेव्हां शिवा माळी व लखमा माळी खोटे होऊन येजितखत लेहून दिल्हीं. परंतु त्याचा संवशय तुटेना. ह्मणून श्रीमंत राजश्री पंतप्रधान याजपाशी फिर्याद गेला. तो साडेतीन महिने लश्कराबरोबर हिंडला. शेवटीं पुणियास आलियावर राजश्री नारो आप्पाजी याजला मनसुबीची चौकशी करावयास सांगितली. त्याणीं चौकशी मनास आणिली. तो पहिली मनसुबी ठीक आहे, ऐसें जाणून शिवा माळी व लखमा माळी यांस पेचिलें. त्यावरून त्याणीं कबूल करून यजितखत खंड माळी वगैरे यांस दिल्हे. दिवाणांत काईम कतबा लिहून दिल्हें. आषाढ शुद्ध १ शुक्रवारीं याप्रा। जालें असे.