वद्य १० गुरुवार. रंगराऊ आपल्या मुलीच्या लग्नास ह्मणोन लश्कराहून कुच करोन मुक्कामास आले. तेथें रात्रीं जाटाचा छापा आला. तेथें मारले. बरोबर, कारकून वगैरे मारलीं, ह्मणोन खबर आली.
वैशाख वद्य १२ मंदवार आत्मारामपंत ढेरे यासी बरें वाटत नव्हतें. त्यास देवआज्ञा जाली.
वद्य १३ रविवार. लवळियावर बाळकृष्णपंतांनीं इनामतिजाईचा रोखा करून, वरात बोरगांवास पाठवून, कुसापा शितोळे व नागोजी शितोळे व येस माळी यासी मार दिल्हा व डोईवर धोंडे देऊन वसूल रु॥ १००० घेतले. पोतें दाखल केलें. बा। काशीराम.
वद्य १४ सोमवार. चिंचवडीहून खबर आली की, त्रिंबकराम धर्माधिकारी याची बायको वेंकू गरवार होती ही कोनी निघाली. पांचवे रोजीं वाखा जाला. सात रोजीं पाहटे वारली. त्यास त्रिंबकराव व नरसिंहभट्ट चिंचवडास आजी गेले.
वद्य १४ सोमवार. मातुश्री लाडूबाई व जगन्नाथपंत काळेवाडीस गेले होते ते आले. ज्या कार्यास गेले तेथें शेत व वाडा मोडून राणोजीबावाचे स्वाधीन केला. त्याची अलाहिदा यादी असे.
जेष्ठमास.
शुद्ध १ बुधवार. यशवंतराऊ दाभाडे सेनापति लष्करांत होते. तेथें त्यामुळें जेर होऊन त्यास देवआज्ञा जाली, ह्मणोन वर्तमान आलें. त्यास आजचा दिवस पांचवा. स्वारी करनाटेहून आले. मिरजेपाशीं जवळपास वारले.
शुद्ध १४ सोमवार. श्रीमंत राजश्री बाळाजी बाजीराऊ प्रधान व राजश्री भाऊ करनाटकाची स्वारी करून गजखिंड व मिरज घेऊन, महाराज राजश्री संभाजी राजे यांची भेटी घेऊन, जेजूरी, थेऊर करून, पर्वतीस जाऊन, तेथें दहा घटका रात्र टाळून, अकरावे घटकेस घरास दाखल जाले. रोजमजकुरींच अवशीचे प्रहररात्रीं राजश्री आयाबा मजमदार याची कन्या, केसोपंतमामाची सून, इजला देवआज्ञा जाली, आयाबाचेथें.
स्मरण शके १६७६ भावनामसंवत्सरे,
जेष्ठमास.
शुध १४ सह १५ भोमवार, अव्वल तारीख छ १२ साबान, सन ११६४, मुहूर सेन खमस खमसैन मया व अलफ.
वद्य १ बुधवारी संतबा देशमूख याची मूल सुप्याचे काटेदेशमुख पदमसिंग यास दिल्ही. रात्रीं घटी १४ लग्न लागलें असे. १
वद्य ४ मंदवार. पेशवे थेवरास चिंतामणीच्या दर्शनास गेले होते.
जेष्ठ वद्य ३० गुरुवारी निळो शंकर ढेरे यास रोजमजकुरीं प्रातःकाळीं देवआज्ञा जाली.