वद्य १४ शुक्रवार.
वद्य ३० मंदवार.
शके १६७६ भावनामसंवछरे
चैत्रमास.
शुद्ध १ रविवार पूर्णमा. रोटीस देशमुख जत्रेस गेले आहेत. धोंडी शेट्या याजकडे कर्ज चिंतामणभट्ट उपाध्ये याचें कर्ज होतें, ह्मणून त्याचे लेक घरीं बैसविले होते. रात्री त्याचा लेक मल्हारी उपाधियाचे घरीं मारला. मढें त्याचेथें दुपारपावेतों पाडलें होतें. त्या मुलाची बायको सती निघों लागली. मग उचलोन नेला. दहन केलें. सती निघाली.
वद्य ३ सह ४ बुधवारीं श्रीमंतांचे पत्र त्याचे मातुश्रीस आलें कीं, कृष्णराऊ महादेव यास देवआज्ञा जाली. अतिसाराची वेथा जाली. आठेक रोज निजेले होते. तुळा केली. उपाय केले. गुण न आला. वारले. त्याचा दाहावा रोज. रोजमजकूर सांडणीबा। पत्र आलें असे. १
वद्य ५ गुरुवारी जिवाजीपंताच्या माणसानें न्हावियाचे घरीं महादा पोर याशीं रिकामीच कटकट केली असे. १
वद्य ६ शुक्रवार जिवाजीपंत आपले भावजयीस पंढरीस वाटे लावावयास वानवडीस गेले असेत. १
वैशाखमास.
शुद्ध २ बुधवारीं सटवोजी पाटील खांदप लोहगांवकर आपले गांवी आला. मरणें मेला असे.
१
शुद्ध ३ गुरुवासर गंगाजीपंत वाघोलकर भालवडीस वारले.
शुद्ध ४ शुक्रवारीं वढूंकर महार गांवांहून आला की, बाल्हाजी पाटील भोंडवा पेशवियाच्या लष्करांत चाकरीस गेला होता, तो वारलियाची खबर आली, ह्मणून सांगावयास आला होता.
वद्य ५ चिंचवडीहून कागद आला कीं, कोंडभट्ट र्धा। याचे पुत्र कुसंभट्ट धर्माधिकारी यासी देवआज्ञा जाली ह्मणोन बाजी कोन्हेर याचे घरीं ही खबर आली.