पौषमास.
पौष शुद्ध २ बुधवारीं राजश्री फत्तेसिंग भोंसले पुणियास आले. त्यांजला सामोरे श्रीमंत वानवडीच्या तळ्यापलीकडे गेले होते. त्याजला घेऊन वाडियांत आले. तेच दिवशीं राजश्री जानोजी निंबाळकर यानीं श्रीमंतांस भेजमानी केली. तेथें पेशवे भोजनास गेले. फत्तेसिंगबावाहि भोजनास गेले. जानबानीं सर्वांस वस्त्रें दिल्हीं.
शुद्ध ६ मंगळवारीं श्रीमंतांनीं राजश्री जानोजी निबाळकर यासी मेजमानी केली.
शुद्ध ६ रविवार, वितिवात. ते दिवशीं रंगो बाबाजी देशपांडे यास संध्याकाळी देवआज्ञा जाली. पांच सा रोज बरें वाटत नव्हतें.
शुद्ध ७ सोमवार रंगो बाबाजी देशपांडे प्रा। पुणें याची स्त्री प्रसूत जाली. पुत्र जाला.
शुद्ध १० गुरुवारीं श्रीमंत राजश्री पंतप्रधान सकाळच्या बारा तेरा घटका दिवस आल्यावरी मुहूर्तेकरून निघोन गारपिराजवळ गेले, डेरियास.
शुद्ध १० सह ११ शुक्रवारी राजश्री चिमाजी आप्पाचें श्राद्ध भाऊनीं गारपिराजवळ डेरियांत केलें. ब्राह्मणभोजन गांवांत केलें.
शुद्ध १३ सोमवारीं राजश्री फत्तेसिंग भोंसले यासी मेजमानी राजश्री संतबानीं केली. वस्त्रें दिल्हीं. त्यावरी गोविंदरायाच्या घरास गेले. त्याणीं वस्त्रें दिल्हीं.
शुद्ध १४ मंगळवारीं जानोजी निंबाळकर कुच करून श्रीमंताजवळ मुंढवियापासी जाऊन राहिला.
शुद्ध १५ बुधवारी कासाराची घरें भटास नेमून दिल्हीं.
वद्य १ गुरुवार सह द्वितीया संक्रमण.
वद्य २ शुक्रवार सह तृतीया किंकरांत.
वद्य ४ मंदवार. श्रीमंत थेवरावर गेले.
वद्य ५ रविवार. महादोबा प्रस्थानें पोतनिसाचे घरीं राहिले. दुसरे दिवशीं हडपसरावर गेले. नांदुराहून सासवडास जाणार.
वद्य ६ सोमवार. महादोबा गेले.
वद्य ७ मंगळवार. थेवराहून कुच होऊन खांबगांवावर गेले.
वद्य ९ गुरुवार. गोविदराव देशमूख याजपासोन कोन्हेर त्रिंबकानीं वकिलीची सनद घेतली होती ते फिरोन आणोन फाडिली.