वद्य ३ बुधवारीं फुलगांवाकडे पाऊस फार पडला. गारा फार पडिल्या.
वद्य ४ गुरुवार रात्रीं पेशवियाचेथें साडे जाले.
वद्य ५ शुक्रवार. खबुतरखानियांत ब्राह्मणास देकार दिल्हा. पंचवीसपर्यंत दिल्ही. खासे द्यावयास गेले नव्हते. त्रिंबकराऊ, राघो शिवराम, वासदेव जोशी यांजकडून देविले. दुसरे दिवशीं अडचा प्रहरा ब्राह्मण सरलियावरी सुटले असेत. १
वद्य ७ रविवारी पेशवियास मांडवपरतणें केलें. अमृतराऊ नाईक निंबाळकर याजला देशमुखानीं मेजवानी केली असे. १
पेशवियाचे बागांत ब्राह्मणभोजन जालें असे.
वद्य ८ सोमवारींहि ब्राह्मणभोजन केलें असे. १
वद्य ९ मंगळवारी पेशवियांनी बागांत सारे मर्हाटे लोक शिलेदार यांजला जेऊं घातलें. रात्री दारू रणांत जाऊन उडविली. रोजमजकुरीं जानोजी निंबाळकर यांच्या राखीच्या लेकास संतूबाई राजश्रीची मानली कन्या दिल्ही. रात्री चौघटकांचे लग्न लागलें. मल्हारजी होळकर यांचे हवेलीमधें.
जानोजी निंबाळकर यास देशमुखानीं आहेर केला. बाबानीं.
वद्य १० बुधवार दसमास जेऊं घातले.
वद्य ११ गुरुवासर पेशवियानीं वाघावर हत्ती घातले. एक वाघ जीवेंच मारला गेला. बागांत शाग्रीतपेशीयांस जेऊं घातलें असे. १
वद्य १२ शुक्रवारी विठ्ठल गोपाळ अत्रे देवजीपंताचेथें राहिले होते. त्याजला दो ती रोजांत वेथा होऊन मृत्य पावले. अवशीचेच रात्री वारले. आजी पाहाटें दहन वोंकारापाशी केले. त्याचे स्त्रीनें सहगमन केलें. पेशवयाचेथें बागांत जिवाजीपंताकडील कारखानियाचे लोक जेऊं घातले असेत. १
वद्य १३ शनवार, शनिप्रदोष. पेशवियानीं गांवचें माणूस जेऊं घातलें असे. १